गव्हाण उड्डाणपूल अंधारात; अपघाताची शक्यता

| चिरनेर । वार्ताहर ।

जे.एन.पी.टी. बंदरातील वाढत्या वाहनांसाठी नवी मुंबईसह उरण पनवेलला जोडणार्‍या गव्हाण पुलाची उभारणी करण्यात आली असून या मार्गावरील सर्वात अधिक मार्गिका असलेल्या पुलावरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधार पसरला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनांना अंधार्‍या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

यापूर्वी या मार्गावरून जाणारे कंटेनर वाहन 50 पेक्षा अधिक फूट खाली कोसळून अपघात झाला होता. या गंभीर अपघातात वाहनचालकांला आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच कंटेनरमधील किंमती मालाचेही नुकसान झाले होते. नागरिकांचा प्रवास जलद गतीने व्हावा या करीता जे.एन.पी.टी. ने 2 हजार 600 कोटी रुपये खर्च केला आहे. त्यातून जे.एन.पी.टी. ते पळस्पे हा पुणे व गोवा महामार्गाला जोडणारा तर जे.एन.पी.टी. ते नवी मुंबई हा ठाणे-दिल्ली महामार्गाला जोडणारा असे दोन सहा व आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारले आहेत.

या महामार्गावरील गव्हाण फाटा हे महत्वाचे ठिकाण असून दोन्ही महामार्ग गव्हाण येथे मिळतात. त्यामुळे गव्हाण उड्डाणपूलावर वाहनांची सततची वर्दळ सुरू असते. त्याचप्रमाणे उड्डाणपूलाचा वापर करून वाहनांना मार्गही बदलावा लागतो. त्यासाठी पुलावर विजेचे दिवे असणे आवश्यक आहे. मात्र गव्हाण या वाहतुकीसाठी महत्वाच्या असणार्‍या उड्डाणपूलावरील वीज अनेकदा गायब असते. याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. पुलावरील अंधारामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे.

Exit mobile version