अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वैभव राणे स्मृति प्रित्यर्थ आवास येथील जोगेश्वरी क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यात गावदेवी गोंधळपाडा संघाने शेकाप चषक 2022 वर आपले नाव कोरले तर टायगरलेन सासवणे हा संघ उपविजेता ठरला.
आवास येथील जोगेश्वरी मैदानावर मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर यांच्या हस्ते सामान्यांचे उद्घाटन करण्यात आले. शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड.आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे आदी यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती.
या सामन्यात 40 संघांनी सहभाग नोंदवला होता. 9 जानेवारी रोजी अंतिम सामना गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध टायगरलेन सासवणे या दोन संघात खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना टायगरलेन सासवणे संघाने 2 षटकात 1 फलंदाज गमावून 19 धावा केल्या होत्या. गावदेवी गोंधळपाडा संघाने 1 फलंदाज गमावून 1 ओव्हर आणि 3 चेंडूत हे लक्ष पार केले.
प्रथम विजेत्या गावदेवी गोंधळपाडा संघाला 55 हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता टायगरलेन सासवणे संघाला 33 हजार रोख व चषक देण्यात आला. तिसर्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला 22 हजार रोख व चषक तसेच चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या संघाला 11 हजार रुपये रोख व चषक देण्यात आला.
ऋषभ शिलधनकर (सासवणे) याला उत्कृष्ट फलंदाज, सागर केसरकर (चोरोंढे) याला उत्कृष्ट गोलंदाज आणि राहुल पेडणेकर (गोंधळपाडा) याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. सामन्याचे पंच म्हणून पुरुषोत्तम भगत, कल्पेश म्हात्रे, राम हाले यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. तर सामन्यांचे समालोचन निनाद कदम, विकास साखरकर, प्रितेश पाटील आणि उत्तम पाटील यांनी केले. जोगेश्वरी क्रीडा मंडळाच्या सर्वच सभासदांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.







