| उरण | प्रतिनिधी |
उरण पूर्व विभागातील वाहने आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची सोय करण्यासाठी मध्य रेल्वेकडून गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंगवर नव्याने पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. सध्या पुलावरील डांबरीकरण, पादचारी मार्ग आणि पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकंदरीत या पुलाचे काम एप्रिल 2026 अखेरीस पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गव्हाण फाटा ते चिरनेर या मार्गावरील गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पूल हा जीर्ण झाल्याने मध्ये रेल्वेने सदर पुलाचे काम 2022 पासून हाती घेतले होते. परंतु, सदर पुलाचे काम हे संथगतीने सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास उरण पुर्व विभागातील विद्यार्थी, प्रवाशी नागरिक, रुग्ण यांना सहन करावा लागत असे. त्यातच अवजड वाहनांच्या वर्दळीतून प्रवासी वाहनांना उलट सुलट मार्गक्रमण करावा लागत असल्याने सर्व वाहनचालक जीव मुठीत धरून आपआपली वाहने रस्त्यावरुन काढत असत. एकंदरीत हा पूल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीस खुला झाल्यानंतर दैनंदिन पाच हजार प्रवासी व वाहनचालकांची प्रतिक्षा संपणार असून, दररोजची मागील तीन वर्षांपासूनची होणारी गैरसोय दूर होणार आहे. एकंदरीत उरण पूर्व विभागातील चिरनेर, आवरे, वशेणी, केळवणे खोपटा मार्गांवरील एसटी बस प्रवास सुरु होऊन रिक्षा व अन्य वाहनातून नागरिकांना पनवेल, मुंबई, नवीमुंबई व ठाणे मार्गांकडे जाण्यासाठी प्रवास हा सुखकर होणार आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गव्हाणफाटा-चिरनेर रेल्वे पूल वाहतूकीसाठी होणार खुला
