। चिरनेर । प्रतिनिधी ।
सात वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उरण पंचायत समितीची रखडलेली आमसभा 28 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जेएनपीए वसाहत येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेसाठी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी विविध शासकीय व निमशासकीय तसेच विविध प्रकारच्या 62 आस्थापनाच्या अधिकार्यांना व संबंधितांना निमंत्रित केले आहे. मागील कित्येक वर्षांच्या जनतेच्या प्रलंबित समस्यांवर आमसभेत जोरदार चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात उरण तालुक्यात प्रामुख्याने अत्यावश्यक असलेले सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय, नादुरुस्त रस्ते, वाहतूककोंडी, वाढते अपघात, अनधिकृत बांधकामे, अनधिकृत कंटेनर यार्ड, अतिक्रमण, पाणी टंचाई, फेरीवाल्यांचा विळखा, वाढती बेरोजगारी, विजेचा लपंडाव, शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आदी प्रमुख विषयांवर महत्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे.