जिंकण्यासाठी खेळाडूंनी केले शर्तीचे प्रयत्न
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात गेल्या दोन दिवसांपासून दिवस – रात्र टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार पहावयास मिळत आहे. शुक्रवारी (दि.21) तिसर्या दिवशीदेखील क्रिकेटचा महासंग्राम झाला. शुक्रवारी दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत दहा सामने खेळविण्यात आले. प्रत्येक खेळाडूने जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

तिसर्या दिवशी पहिला सामना राजपुरी पँथर्स आणी चेंढरे चॅम्पीयन यांच्यामध्ये झाला. चेंढरे संघाने पाच षटकात 46 धावा केल्या होत्या. राजपूरी संघासमोर विजयासाठी 47 धावांची आवश्यकता होती. अखेर या संघाने 47 धावा करीत विजय मिळविला. या स्पर्धेतील आकाश भायतांडेल हा सामनावीर ठरला. दुसरा सामना बेलोशी बिग बूल्स व सारळ स्ट्रायकर्स या संघात झाला. बेलोशी संघाने पाच षटकात 69 धावा केल्या होत्या. त्यामुळे सारळ संघाला विजयासाठी 70 धावांची गरज होती. मात्र, बेलोशी संघाने सारळ संघाला विजयापर्यंत पोहचून न देता सात बाद आणि फक्त 33 धावा दिल्या. त्यामुळे बेलोशी बीग बुल्स संघ विजयी ठरला असून, सौरभ गव्हाणकर या खेळाडूने सामनावीरचा किताब मिळविला.

तिसरा सामना उसरोली वंडर्स आणि खारगाव हंटर्स या संघामध्ये झाला. खारगाव संघाने पाच षटकात 64 धावा केल्या होत्या. उसरोली संघाने पाच षटकात 65 धावा करीत विजय मिळविला. या स्पर्धेतील आकाश तवसाळकर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. चौथा सामना आंबेपूर टायगर्स आणि शहापूर स्माशर्स दोन संघामध्ये झाला. आंबेपूर संघाने चार बाद, 71 धावा केल्या होत्या. शहापूर संघाला विजय मिळविण्यासाठी 72 धावांची गरज होती. परंतू ,आंबेपूर संघाने शहापूर संघाचे सात खेळाडू बाद करून फक्त 48 धावा या संघाला दिल्या. त्यामुळे आंबेपूर संघ विजयी झाला असून, निशी कर्णेकर सामनावीर ठरला.

त्यानंतर पाचव्या सामन्याची लढत राजपूरी पँथर्स आणि बेलोशी बीग बुल्स या संघात झाली. बेलोशी बीग बूल्स संघाने पाच षटकात 60 धावा करीत विजय मिळविला. या संघातील खेळाडू मुकादम याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

सहावा सामना आंबेपूर टायगर्स आणि उसरोली वंडर्स या संघामध्ये झाला. उसरोली संघाने पाच षटकात 66 धावा केल्या. आंबेपूर संघासमोर विजयासाठी 67 धावांचे लक्ष होते. परंतु उसरोली संघातील फलंदाजांना रोखत फक्त 49 धावांमध्ये हा खेळ संपविला. त्यामुळे उसरोली संघ विजयी ठरला असून आकाश तवसाळकर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सातवा सामना सारळ स्टायकर्स आणि चेंढरे चॅम्पीयन या संघामध्ये झाला. चेंढरे संघाने 56 धावा करीत विजय आपल्या खिशात घेतला. या स्पर्धेतील सामनावीर प्रशांत मोहरे ठरला आहे.

आठवा सामना शहापूर स्माशर्स व खारगांव या दोन संघामध्ये स्पर्धा झाली. खारगांव संघाने पाच बाद, 47 धावा केल्या होत्या. शहापूर संघाने पाच षटकात 48 धावा केल्या. त्यामुळे हा संघ विजयी झाला असून संघातील खेळाडू विश्वेस पाटील याला सामनावीरचा बहूमान देण्यात आला. नववा सामना चेंढरेचॅम्पीयन आणि राजपूरी पँथर्स या संघामध्ये झाला. राजपूरी संघाने पाच षटकात 67 धावा केल्या होत्या. चेंढरे चॅम्पीयन संघाने 72 धावा करीत विजय मिळविला. तसेच दहावा सामना आंबेपूर टायगर्स आणि शहापूर स्माशर्स या संघामध्ये झाला. आंबेपूर संघाने पाच षटकात 39 धावा केल्या होत्या. शहापूर संघाने 40 धावा करीत विजय आपल्याकडे खेचला. त्यामुळे शहापूर संघ विजयी ठरला असून, आदर्श पाटील या खेळाडुला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.