रायगडात सर्वसाधारण पाऊस

राज्यात पावसाची ओढ; खरीपाची पिके संकटात

| पुणे | प्रतिनिधी |

जुलै महिन्यात राज्यभर झालेल्या दमदार पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांत पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसाचे सावट निर्माण झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती चिंताजनक असून, ऑगस्टअखेरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नसल्याने खरीप पिकांसह पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वसाधारण पाऊस नोंदविण्यात आला आहे.

एक जून ते 19 ऑगस्टदरम्यान कोकण-गोव्यात सरासरीपेक्षा चार टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात 11 टक्के अधिक, मराठवाड्यात 21 टक्के कमी, तर विदर्भात 19 टक्के कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. जुलैअखेर राज्यात सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील एकूण पावसाची तूट पाच टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी पुढील काळ महत्त्वाचा ठरणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्येही पावसाची कमतरता असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील पाणीटंचाई तसेच खरीप पिकांच्या स्थितीवर पुढील काळात लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

Exit mobile version