उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उत्पादन खर्च परडवत नसल्याने शेतकर्‍यांची मुले आता शेती व्यवसायात पडत नाहीत. शेतीतील मजूर खर्च, खते, बियाणे इत्यादी खर्च आवाच्यासव्वा वाढल्याने व उत्पादक खर्चावर आधारित भाव नसल्याने शेती हा व्यवसाय आता आतबट्ट्याचा झाला आहे. त्यातच निसर्गाची साथ नसल्याने शेती हा व्यवसाय नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परवडत नसल्याने शेतकरी शेती ओसाड टाकत आहे. तरुणांना पुन्हा शेतीकडे वळविण्यासाठी शेतकर्‍याच्या मालाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे, असे मत अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील कृषी अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शंकर पिंगळे यांनी व्यक्त केले आहे.

एकेकाळी शेतकर्‍याने एक खंडी भात जर विकला तर 3-4 तोळे सोने विकत यायचे. तेच एक तोळे सोने खरेदी करायचे झाल्यास आता शेतकर्‍याला 7-8 खंडी भात विकावे लागते. ज्या सोन्याने पोट भरत नाही. त्या सोन्याचा भाव पूर्वीच्या भावाच्या 300 ते 400 पटीत वाढला. शेतीला खर्चाच्या बाबतीत ही पूर्वी एक एकर शेती करण्याचा खर्च 150 ते 200 रु. होता. तोच खर्च आज 20 हजार ते 25 हजार होतो. उत्पन्न मात्र 10 हजार ते 15 हजार तेही निसर्गाची साथ मिळाल्यास. शासनकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या अर्थशास्त्राचा कधी विचारच केला नाही.

शासनकर्त्यांनी प्रत्येक मानवाच्या हाताला काम, श्रमाला योग्य दाम, उगाच जनतेला फुकटातले खाण्याची सवय लावू नये. फुकटात सेवा देणे व अर्थकारण कोलमडून टाकून नोकरदार, जमीनदार, पेन्शनदार, श्रीमंत सारे रेशनिंग घेतात. जो आदिवासी समाज रोज जेवून-खाऊन 400 ते 500 रुपये कमावतो तोही हे रेशनिंग धन्य विकतो. राजरोसपणे धान्य विकत असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांना फुकटची सवय न लावता, योग्य काम आणि त्यास योग्य मोबदला दिला पाहिजे. तसेच शेतकर्‍यांच्या मालाला योग्य हमीभाव शासना द्यावा, अशी अपेक्षा कृषी अभ्यासक प्रभाकर पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version