सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीत तीन उमेदवार वगळता महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसला चांगले यश मिळाले. निवडणूकीचा निकाल समाधानकारक आहे. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत एक परिवर्तन झाले आहे. नगराध्यक्ष उच्च शिक्षित असून, अनेक भाषांवर प्रभूत्व असणारी आहे. ती चांगले काम करणारी नगराध्यक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी गोरगरीब, कष्टकऱ्यांसोबत आहे. त्यांना केंद्रबिंदू ठेवून शेकापने काम केले आहे.

आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून काम करायचे आहे. संविधान तसेच लोकशाही जगली पाहिजे, यासाठी महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत एकत्र येऊन मोठ्या ताकदीने लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील व शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा वाढदिवस सोहळा सोमवारी (दि.22) शेतकरी भवन येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अलिबागचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख शिवानी जंगम, संतोष जंगम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, ॲड. उमेश ठाकूर, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, प्रमोद घासे, ॲड. सचिन जोशी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, ॲड. परेश देशमुख, ॲड. विजय पेढवी, अनिल शांताराम पाटील, अनिल गोमा पाटील, आदींसह जिल्हा, तालुक्यातील वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आदी विविध क्षेत्रातील मंडळी, कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे यांनी केले. तर प्रास्ताविक विक्रांत वार्डे यांनी केले.
यापुढे मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, प्रशांत नाईक यांनी अलिबाग नगरपालिका चांगल्या पध्दतीने सांभाळली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांचे काम खऱ्या अर्थाने कौतूकास्पद आहे. आजचा वाढदिवस व सन्मान सोहळा हा कौटूंबिक असून, या भव्यदिव्य सोहळ्यातील उपस्थिती पाहून भारावून गेलो आहे. अलिबाग नगरपरिषदेमध्ये तीन जागा गेल्याचे दुःख झाले असून खंतही वाटत आहे. याबाबत एकत्रित बसून आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ज्या जागा गेल्या, त्या जातील अशी अपेक्षा नव्हती. आपण अलिबाग शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम केले आहे. अधिक वेगळ्या पध्दतीने अलिबागचा विकास करून शहराचा एक वेगळा कायापालट करण्याची भूमिका आहे. या निवडणूकीत आपल्याला 82 टक्के मते पडली आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. कमी वय असणारी राज्यातील पहिली नगराध्यक्ष म्हणून तिचा सन्मान होत आहे. अलिबाग शहरातील काही भागांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पाणी प्रश्नदेखील सोडविला जाणार आहे. पर्यटन वाढीबरोबरच नागरिकीकरण देखील वाढत आहे. एमएमआरडीए अंतर्गत असणाऱ्या नगरपालिकांना मुंबईचा दर्जा मिळाला पाहिजे. त्या पध्दतीने काम होणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. अलिबागमध्ये स्व.मधूकर ठाकूर, नारायण भगत असे अनेक आमदार होऊन गेले. त्यांनी अलिबागचे नाव उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, सध्या सत्तेसाठी लोकप्रतिनिधींचा दर्जा खालावत असल्याचं दिसून येत आहे, असा टोला शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांना नाव न घेता जयंत पाटील यांनी लागवला.
नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सन्मान
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये नगराध्यक्षा अक्षया नाईक, नगरसेवक प्रशांत नाईक, ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. निलम हजारे, अनिल चोपडा, सुषमा पाटील, संतोष गुरव, संध्या पालवणकर, डॉ. साक्षी पाटील, आनंद पाटील, ॲड. निवेदिता वाघमारे, समिर ठाकूर, ॲड. ऋषीकेश माळी, ॲड.अश्विनी ठोसर, योजना पाटील, सागर भगत, शैला भगत, वृषाली भगत यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.



























