| अलिबाग | प्रतिनिधी |
सध्या अलिबाग, मुरूड रोहा मतदार संघाची काय परिस्थिती आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलांची अवस्था बिकट झाली आहे. विद्यार्थी, महिला, कामगारांना चिखल, खड्यातून प्रवास करावा लागत आहे. खड्यांमुळे एसटी फेऱ्या बंद आहेत. प्रवासी त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटरच्या नावाखाली तिप्पट वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि दादागिरी रेटून करायची ही विरोधकांची भुमिका आहे. आता हे खपवून घेणार नाही. सोशल मिडीयाचा आधार घेत वेगवेगळे व्हिडीओ टाकले जात आहेत. हे चाळे बंद झाले पाहिजे, त्या पध्दतीने आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गल्लीसह वाड्या वस्त्यांसह शहरी भागात दंडेलशाही विरोधात तुकडी तयार केली पाहिजे. विरोधक काही चुकीचे करीत असेल तर रोखणे आवश्यक आहे. शेतकरी कामगार पक्षाची 78 वर्षाची परंपरा आहे. तीन पिढीचा वारसा आहे. संघर्षातून पक्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे चवळ्या पवळ्यांना महत्व न देता आपल्या पक्षाची ताकद त्यांना दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. चित्रलेखा पाटील यांनी हजारो मुलींना सायकली वाटप केल्या आहेत. कोरोना काळात रुग्णांबरोबरच गरीब गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्यांचे कार्य समाजाच्या हितासाठी आहे. मिठेखार येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला जागे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचे कार्य मोलाचे आहे, असे मानसी म्हात्रे यांनी सांगितले.






