अनंत गीते यांचे युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
| माणगाव | प्रतिनिधी |
आगामी लोकसभा निवडणुकीत 32 रायगड लोकसभा मतदारसंघातून किमान दोन लाख मतांच्या फरकांनी आपण विजयी होऊ, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री अंनत गीते यांनी माणगाव येथील युवा मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. तसेच, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहनही गीते यांनी केले.
युवा महाराष्ट्र मेळावा अंतर्गत रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा युवा मेळावा माणगाव येथे मोतीराम बँक्वेट हॉल याठिकाणी मंगळवारी (दि.12) सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून अनंत गीते यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगने, जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील, सुरेंद्र म्हात्रे, सुधीर सोनावणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेतृत्व संदीप तटकरे, युवा कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव, योगेश निमसे, अंकित प्रभू, जिल्हा महिला संघटिका डॉ. स्वीटी गिरासे, सदस्या धनश्री विचारे, प्रांजळ महाडेश्वर, रुची राऊत, नगरसेवक अजित तारळेकर, विस्तारक सुधीर लहाने, अजिंक्य मोरे, तालुका युवा सेना अधिकारी रणजित मालोरे आदींसह युवा- युवती शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अनंत गीते पुढे म्हणाले की, येत्या 15 मार्च रोजी अलिबागला पीएनपी नाट्यग्रहात इंडिया आघाडीचा पहिला मेळावा संपन्न होणार आहे. त्यापूर्वी हा युवक मेळावा माणगावात संपन्न होत आहे. इंडिया आघाडीचे दिल्ली, बंगळुरू त्याठिकाणी नेत्यांचे झालेले मेळावे यशस्वी झाले आहेत. आता इंडिया आघाडीत सहभागी असणार्या सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांना तसेच, घटक पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्रित आणून या निवडणुकीसाठी आपल्या सर्व शिवसैनिकांनी सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. अलिबागमधील इंडिया आघाडीचा मेळावा झाल्यावर चित्र स्पष्ट होऊन त्या-त्या पक्षातील नेतेमंडळी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या निमित्ताने काम करण्याच्या सूचना देतील. माझी उमेदवारी तीन महिन्यांपूर्वी आरडीसीसी बँकेचा उद्घाटन समारंभ श्रीवर्धन येथे होता, त्यावेळी बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे म्हणाले की, रायगड लोकसभा मतदार संघात युवा सेनेच्या स्थापनेपासून प्रचंड ताकद आहे. मोठी टीम युवकांची वारंवार या मतदार संघात दिसली आहे. हा लोकसभा मतदार संघ प्रचंड मोठा आहे. गुहागरच्या कोपर्यापासून अलिबागच्या किनार्यापर्यंत हा मतदारसंघ आहे. मतदारसंघनिहाय युवकांनी इंडिया आघाडीतील सर्व पक्ष व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम केल्यास या निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठे यश मिळेल. अनंत गीते यांना आपल्याला दणदणीत मतांनी विजयी करायचे आहे. भाजपने 2014 मध्ये जो वचननामा प्रसिद्ध केला होता, त्यातील 90 टक्के कामे अपूर्ण राहिली. महिला असुरक्षित आहेत, युवकांच्या नोकर्यांचा प्रश्न, महागाई वाढलेली आहे, या भाजप सरकारने सर्व उद्योग-धंदे हे गुजरातला नेऊन ठेवले असल्याचे ते म्हणाले. यावेळी युवासेना सदस्या धनश्री विचारे, विक्रांत जाधव, अंकित प्रभू आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.