| कर्जत | प्रतिनिधी |
नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर घडलेली दुर्दैवी घटना ही कटाचा भाग असून, निष्कारण आपल्या नेत्याला त्रास दिला जात आहे. तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता न करता जोमाने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती पुंडलिक पाटील यांनी केले. परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जात असून, कायद्याची प्रक्रिया सुरू असल्याने लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना पुंडलिक पाटील बोलत होते. त्यांनी सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीच्या यशाचा आनंद साजरा होत असतानाच एक कटू प्रसंग घडला. सुतारवाडी येथे कट रचल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, त्या ठिकाणी चारशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. अशा परिस्थितीत असे काही होणे शक्य नाही. काय चालले आहे, हे सर्वांना माहीत आहे. अगदी पोलीस अधीक्षकांनाही याची माहिती आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
ते पुढे म्हणाले की, आपण परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. तडजोडीअंती एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही, तरी कुणीही नाराज होऊ नये. आपली सत्ता आली तर प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चितच सन्मान मिळेल. यावेळी तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला आहे. इतर पक्षांशीही चर्चा सुरू असून, उमेदवार निवडीसाठी वेळ लागत आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी परिस्थिती समजून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. राजेंद्र निगुडकर यांनी लवकरच आपले नेते सुधाकर घारे कर्जत येथे येणार असल्याचे सांगून, तोपर्यंत सर्वांनी संयम राखावा, असे आवाहन केले. मधुकर घारे यांनीही आपल्यावर लादलेले संकट लवकरच दूर होईल. सत्य हे सत्यच असते. कुणीही विचलित न होता, दबावाला बळी न पडता निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे मत व्यक्त केले.
यावेळी ॲड. रंजना धुळे, एकनाथ धुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे आभार प्रदर्शन शरद तवळे यांनी केले. या आढावा बैठकीस तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, शहराध्यक्ष भगवान भोईर, तालुका महिला अध्यक्ष रंजना धुळे, नारायण डामसे, धोंडू राणे, अशोक सावंत, परशुराम घारे, बाळू थोरवे, राजेंद्र निगुडकर, अवेश जुवारी, ऋषिकेश राणे, अरुण हरपुडे, पंकज पाटील यांच्यासह विलास माळी, मंगल ऐनकर, प्रमोद पिंगळे, राजाभाऊ कोठारी, लक्ष्मण लोहकरे, समीर देशमुख, भानुदास मिसाळ, अमीर माणियार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जोमाने कामाला लागा: पुंडलिक पाटील
