तळीयेमध्ये पुन्हा उभारणार घरकुल; बांधकाम प्रक्रियेला वेग

। महाड । प्रतिनिधी ।
गेल्यावर्षी निसर्गाच्या प्रकोपात जमिनीत गाढल्या गेलेल्या तळीयेत पुन्हा नवी घरे उभारण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरु असून, म्हाडाच्या पुढाकाराने घरे गमावलेल्यांना आता मजबूत नवीन घरे प्राप्त होणार आहेत.

तळीये हे सुमारे 1300 लोकवस्तीचे गाव पुर्णतः वाहून गेले. अतिवृष्टीमुळे तळीये येथील कोंडाळकरवाडी, बौद्धवाडी येथील 66 घरांवर दरड कोसळून जिवीतहानी झाली. या गावात राहात असलेलेली 271 कुटुंब एकाच दिवसात बेघर झाली. 87 लोक मृत्युमुखी पडले आणि काही जखमी झाले. केवळ मनुष्यच नाही तर 59 पशुधन आणि 112 कोंबड्या यांची जिवीतहानी झाली.

दुर्घटनेतील घरांची पुनर्बांधणी म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी तळीये येथील थेट खरेदीने एकूण 15.23.99 हे.आर. भूसंपादन करण्यात आले असून 2.14.841 हे.आर. भूसंपादन सक्तीने करण्यात आले. असे एकूण 17.38.80 हे.आर. जागेचे भूसंपादन करण्यात आले.

येथील एकूण 271 घरांचे पुनर्वसन करायचे आहे. म्हाडाने इथला सर्व्हे केल्यानंतर एकूण 231 घरांचा लेआऊट तयार करण्यात आला असून या ठिकाणी 40 घरांच्या पुनर्वसनासाठी जागा कमी पडत आहे. या 40 घरांसाठी जागा कमी पडत असल्यामुळे एकूण 4.57.10 हे.आर. अतिरिक्त जागा म्हाडा कार्यालयास सुचविण्यात आली. त्यांचा कुटुंब सर्व्हे पूर्ण झाला आहे. तळीये येथील मूलभूत सोयीसुविधेचे कामकाज जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या मार्फत करण्यात येत आहे. तसेच तळीये येथील 66 घरांचे पुनर्वसन म्हाडाकडून प्राधान्याने करण्यात येत आहे.

आपत्तीला तोंड देणारी घरे
म्हाडाकडून घराचे पुनर्वसन करण्यात येत आहे तर इतर सुविधा शासनाच्या इतर विभागाकडून पुरविण्यात येणार आहे.म्हाडातर्फे बांधून देण्यात येणारी घरे ही पक्की आणि कोणत्याही आपत्तीला तोंड देणारी असतील. या कामाला सुरुवात होत असून तळीये वासियांचे लवकरच पुनर्वसन होणार आहे.

Exit mobile version