नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड नगरपरिषदेकडून नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ भरुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत 48 टक्के लोकांनी घरपट्टी भरली असून, उर्वरित नागरिकांनी मार्च महिन्याच्या आत ती भरणे क्रमप्राप्त आहे. यासाठी नगरपरिषदेकडून जनजागृती करण्यात येत आहे.
मुरुड शहराची लोकसंख्या 12 हजारांच्या आसपास असून, येथे घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा सरासरी वार्षिक आकडा 90 टक्केच्या आसपास आहे. लोक उत्तम सहकार्य करणारे असून, आपले देयके भरण्यात त्यांचा नेहमीच प्रामाणिकपणा दिसून येत आहे. सध्या नगरपरिषदेने वसुली मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जनजगृतीबरोबरच कर्मचारी स्वतः लोकांच्या घरी पोहोचत असून, नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करीत आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.





