वृक्षसंवर्धनातून बहरतोय नदीचा घाट

उल्हास नदी निर्मल जल अभियानातून वृक्षलागवड
| कर्जत | प्रतिनिधी |
उल्हास नदी निर्मल जल अभियानतर्फे कर्जत उल्हास नदी किनारी संत तुकाराम घाट आणि संत ज्ञानेश्‍वर घाटावर वृक्षलागवड करून गेल्या पावणे चार वर्षांपासून त्यांचे संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे आज ही झाडे मोठी झाली असून, त्यातून नदीचा घाट वृक्षराजीने बहरताना दिसून येत आहे.

आत्तापर्यंत संस्थेने तसेच कर्जतमधील अनेक नागरिकांनी विविध प्रकारची झाडे संस्थेला दिली. काही जणांनी स्वतः येऊन रोपण केली. ती रोपे संस्थेने आणि नागरिकांनी जोपासली आहेत. 2019 ते 2022 या दरम्यान पावसाळ्यात दोन वेळा आलेल्या पुरात काही झाडे वाहून गेली, तर काही झाडे जागेवरच आडवी झाली होती. ती संस्थेतर्फे मशागत करून पुन्हा उभी करण्यात आली आहेत. त्यामध्ये वड-5, जांभूळ-10, पिंपळ-4, कडुनिंब-3, कदंब-4, आंबा-7, मोहगनी-1, नारळ-2, हरडा-1, कांचन-1, पेरू-2, सीताफळ-1, ताम्हण-2, फणस-4, खोया-1, बेल-1, उंबर-2, बहावा-1 अशा एकूण 52 झाडांचा समावेश आहे. याशिवाय तुळस, दुर्वा, सदाफुली, तगर, डबल तगर, जास्वंदी, पारिजात, तीन रंगाच्या गुलबाक्षी अशी फुलझाडे जतन केली आहेत.

गेल्या वर्षी संस्थेतर्फे आंब्याच्या कोयी आम्हाला देण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचे फलित म्हणून शेकडो आंब्याची रोपे दिसून येत आहेत. या वृक्षसंपदेची फळे आपल्याला काही वर्षात मिळण्यास सुरुवात होईल. या वृक्षराजीमुळे आपल्याला मिळणारा ऑक्सिजन हा सर्वात मोठा फायदा. याच जोडीला नदी किनारा सुरक्षित राहील. याच अनुषंगाने हे नदी किनारे स्वच्छ करण्यासाठीसुद्धा संस्थेचा अभियातून प्रयत्न असतो, असे सदस्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Exit mobile version