घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; 14 जणांचा दुर्दैवी मुत्यू

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईच्या पूर्व नगरमध्ये असणाऱ्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळले. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 74 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जवळपास 15 हजार चौरस फुटांच्या भल्यामोठ्या होर्डिंगची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आहे.

या होर्डिंगबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग लावण्यात आले होते. घटना घडली त्यावेळी पेट्रोल पंपजवळ 100 हून अधिक जण होते. होर्डिंग पडताच अनेक जण खाली अडकले. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ यांनी बचावकार्य केले. दुपारपर्यंत बचावकार्य सुरु होते. होर्डिंगखाली अडकलेल्या 86 जणांची सुटका करण्यात आली. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 14 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले होर्डिंग परवानगीशिवाय उभारण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, त्या जागेवर 4 होर्डिंग होते. त्याचा तपशील पोलीस आयुक्तांना आणि एसीपींना दिली होती. होर्डिंग लावण्यापूर्वी रेल्वेकडून पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीला पालिकेने नोटिस पाठवली आहे. पालिकेकडून कमाल 40 बाय 40 चौरस फुटांच्या होर्डिंगला परवानगी देण्यात येते. पण कोसळलेले होर्डिंग 120 बाय 120 चौरस फुटांचे होते. त्याचा एकूण आकार 15 हजार चौरस फूट इतका होता. भावेश भिडे हा ‘इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट’चा निर्देशक आहे. घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग याच कंपनीच्या मालकीचे आहे. या दुर्घटनेनंतर भावेश भिडे हा त्याच्या कुटुंबासहीत फरार झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 

Exit mobile version