गिल अन् यशस्वीचा पत्ता कट?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल नंतर लगेचच टी-20 विश्‍वचषक खेळला जाणार आहे. त्यासाठी संघ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करायचा आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. यंदाच्या विश्‍वचषकसाठी भारतीय संघात कोण-कोणत्या खेळाडूंचा समावेश होणार, हा प्रश्‍न आहे. दरम्यान, आयपीएल खेळणार्‍या शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांपैकी एकाला वगळले जाऊ शकते, अशी बातमी आहे.

विश्‍वचषकात रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार हा मोठा प्रश्‍न आहे. मात्र, या प्रश्‍नाचे उत्तर संघाची घोषणा होण्यापूर्वीच सापडले आहे. मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज इशान किशन किंवा गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसतील, अशी अटकळ बांधली जात होती, पण आता जे नाव समोर आले आहे ते आश्‍चर्यचकित करणारे आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामी करणारा विराट कोहली रोहितसोबत ओपनिंग करताना दिसू शकतो, असा दावा केला जात आहे. काही महिन्याआधी विराट कोहली संघात असणार का नाही, यावरही प्रश्‍नचिन्ह होते. अहवालात असा दावा केला जात होता की, भारतीय संघ निवडकर्ता विराट कोहलीला सलामीवीर म्हणून खेळवण्याचाही विचार करत आहे. यामुळे ईशान किशन, शुभमन गिल आणि इतर अनेक खेळाडूंना मोठा झटका बसला आहे, जे ओपनिंगचा दावा करत होते.

Exit mobile version