जिओनी पळवले श्रीवर्धनकरांच्या तोंडचे पाणी

फायबर केबलसाठी खड्डा खोदताना जलवाहिनी फुटली
। श्रीवर्धन । वार्ताहर ।

शहरात गेल्या महिनाभर जीओ फायबर केबल टाकण्यचे जोरात काम सुरू आहे. दरम्यान, मशीनद्वारे निष्काळजीपणे खड्डे खणत असताना रानवली धरणामधून श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे श्रीवर्धनवासीयांना चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे.
दरम्यान, केबल टाकण्यासाठी दोन खड्ड्यांमध्ये तीनशे ते चारशे मीटर अंतर ठेवून आठ फूट खोलीचे खड्डे खोदून ठेवण्यात आले होते. खड्डा खणून झाल्यानंतर आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे बॅरिकेट्स, रिबीन, पांढरा रंग लावलेले दगड ठेवण्याची दखल न घेतल्यामुळे रात्रीच्या सुमारास खड्ड्यात दुचाकी पडल्याच्या घटना ताज्या असतानाच तवसाळकर हॉटेल, नगरपरिषद व श्री सोमजादेवी मंदिराच्या समोर जलवाहिनी फुटल्यामुळे श्रीवर्धनवासियांना चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. रानवली धरण येथे जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या टाक्यांचे काम सुरू असल्यामुळे तसेच आराठी येथे पाण्याचा साठा करण्यासाठी टाकीचे काम सुरू असल्यामुळे गेले दहा दिवस एक दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, जलवाहिनी फुटल्यामुळे श्रीवर्धनवासियांना दुष्काळात तेरावा महिना अनुभवायला मिळत आहे.
श्रीवर्धन येथील स्थानिकांनी जीओ कंपनीने पाण्याच्या टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली असून, नगरपरिषदेने जिओ कंपनीकडून आर्थिक दंड वसूल करावा, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

Exit mobile version