| पनवेल | वार्ताहर |
बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेनंतर बालिकांवरील अनेक अत्याचाराच्या घटनांना वाचा फुटत आहे. पनवेलमध्ये दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका प्रकरणाला वाचा फुटली असून, पोलीस अत्याचारी रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
21 ते 22 जूनदरम्यान ही घटना पळस्पे फाटा येथील खासगी संकुलाच्या एका वाहनतळात ही घटना घडली. विशेष म्हणजे, खासगी विकासकाने बांधलेल्या या महागृहनिर्माणाची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचा दावा केला जात होता. पळस्पे फाटा येथील पारपुंड गावात राहणार्या 25 वर्षीय रिक्षाचालकाने त्याच्या ओळखीच्या 13 वर्षाच्या बालिकेला 21 जूनच्या रात्री आठ वाजता आजिवली गावाजवळून रिक्षात जबरदस्तीने बसवून पळस्पे फाटा येथील महागृहनिर्माणामधील एका इमारतीच्या वाहनतळात घेऊन जाऊन तेथेच तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांना पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडित बालिकेला दुसर्या दिवसापर्यंत नराधम रिक्षाचालकाने स्वतःच्या ताब्यात ठेवल्यावर दुसर्या दिवशी सकाळी तिला सात वाजता तिच्या घरी सोडले. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी या गंभीर प्रकरणात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.