लेदरबॉलवर मुलींची ‌‘झुंझार’ खेळी

पोयनाडच्या झुंझार मंडळातर्फे अभिनव उपक्रम ; कै. मिलिंद चवरकर स्मृती चषक स्पर्धा


| रायगड | प्रतिनिधी |

आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहेत. मात्र अजूनही खेळांमध्ये पुरुष व महिला यांच्या स्पर्धा स्वतंत्रपणेच भारावल्या जातात. टेनिस व बॅडमिंटनमध्ये मिक्स डबल्सचे सामने खेळवले जातात. मात्र क्रिकेट , फुटबॉल इत्यादींमध्ये पुरुष व महिलांचे एकत्रित संघ खेळण्याची कल्पना पुढे आलेली नाही. पोयनाडच्या झुंझार युवक मंडळाने मात्र हि कामगिरी करून दाखवली आहे. गेली तीन वर्षे ते मुलं मुलींच्या एकत्रित संघांचे सामने अत्यंत यशस्वीपणे भरवत आहेत.

विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी उल्लेखनीय आहे.मुलींच्या ‌‘झुंझार’ खेळीमुळे संघाला विजय मिळविणे शक्य झाल्याचे चित्र या स्पर्धेमध्ये आहे. यंदादेखील लेदरबॉल स्पर्धेत महिलांचा दबदबा पहावयास मिळाला. मुलींनी फलंदाजी , गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे क्रिकेट निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. झुंझार युवक मंडळ पोयनाड यांनी कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक कनिष्ठ वयोगटातील एकदिवसीय 40 षटकांची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण 12 संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघात मुलांच्या बरोबर मुलींना सुद्धा खेळण्यास संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रत्येक संघात किमान 5 मुलींचा सहभाग आहे. झुंझारच्या मैदानावर मुलींनी आपल्या अष्टपैलू खेळीने आपापल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. मुले आणि मुलींच्या एकत्रित संघांच्या स्पर्धेमुळे मुलींना आपली उत्कृष्ट खेळी करता येते. यामुळे यापूवी झालेल्या स्पर्धांमधून रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळणाऱ्या मुलींना संधी मिळाली. या मैदानावर आपल्या खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या समृद्धी कांबळे, रोशनी पारधी, आर्या गडदे आणि समिधा तांडेल यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. अन्य संघातील 20 मुलींचे रायगड जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे.

लेदरबॉल स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये खोपोलीच्या स्तुती विठलानीने एका सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा अर्धा संघ आपल्या फिरकीने तंबूत पाठवून संघाला विजय मिळवून दिला आहे. तिला सामानावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे अलिबागची तनिष्का वारगे ( फलंदाज ) ,खोपोलीच्या वैभवी कुलकर्णी आणि गीतांजली शर्मा ( गोलंदाज ) , निशा विठलानी , वेदांगी धनानी , खारघरची देविका रामप्रसाद , पनवेलची स्वरा जगताप , खोपोलीच्या श्रेया पडळकर , अन्वेषा हंबे ( अष्टपैलू ) या मुलींनी झालेल्या सामन्यांमध्ये आपल्या खेळीने मैदानावर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. यामुळे या मुलींना उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे. अजून या स्पर्धेतील 20 सामने शिल्लक आहेत. यामुळे जिल्ह्यातील मुलींची शैलीदार खेळी झुंझारच्या मैदानावर पहावयास मिळणार आहे.

जिल्ह्यातील युवा मुलामुलींमधून क्रिकेटपटू घडवण्यासाठी झुंझार युवक मंडळ पोयनाड प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मुलामुलींच्या एकत्रित संघातील मुलींची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी , उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण डोळ्याची पारणे फेडणारे आहे. मुलांच्या शैलीपेक्षा मुलींच्या खेळण्याची शैली उत्कृष्ट आहे. अद्याप या स्पर्धेतील केवळ तीन सामने झाले आहेत. अजून 20 सामने होणार आहेत. यामुळे मुलींची क्रिकेट खेळातील रणनीती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अन्वर बुराण, अध्यक्ष, झुंझार युवक मंडळ

झुंझार युवक मंडळाने गेल्या दोन वर्षात मिक्स क्रिकेटच्या चार स्पर्धा भरवल्या. या स्पर्धांमधूनच अनेस मुलींना जिल्हा आणि राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. यामुळे क्रिकेटला आपले विश्व बनविणाऱ्या रायगड जिल्ह्यातील मुलींना प्रोत्साहन मिळाले आहे. या स्पर्धांवर रायगड आणि महाराष्ट्र निवड समितीचे लक्ष असते. यामुळे उत्कृष्ट क्रिकेट खेळणाऱ्या मुलींना भविष्यात देशासाठी क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांमध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय आहे. त्यांचा खेळ देखील तितकाच अप्रतिम आहे.

रोशनी पारधी
एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड
Exit mobile version