शंभर टक्के नोकरीची लेखी हमी द्या: विक्रांत वार्डे

| अलिबाग | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील वडखळ-डोलवी येथे तिसऱ्या टप्प्यातील जेएसडब्ल्यू प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी लगबग सुरू झाली आहे. या प्रकल्पाचे शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. मात्र, प्रकल्प उभारत असताना स्थानिकांना शंभर टक्के कायम नोकरी मिळावी, याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी शेकाप पुरोगामी युवक संघटना तालुका प्रमुख विक्रांत वार्डे यांनी केली आहे.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाला सशर्त पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. कंपनीने जनहिताच्या मागण्यांचा विचार करणे गरजेचे आहे. शंभर टक्के कायम नोकरीची हमी तोंडी न देता लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे. तोंडी आश्वासन देणारे अधिकारी बदलून गेल्यावर लिखीत कराराने रोजगार सुरक्षीत राहील. स्थानिकांना त्यांच्या शेत जमीनीच्या सुपिकतेची हमी, प्रदुषणामुळे आरोग्याला हानी न होण्याची हमी लिखीत करार स्वरुपात द्यावी. जेएसडब्ल्यू कंपनीच्या रुग्णालयामध्ये तालुक्यातील रुग्णांना माफक दरात आणि प्रदुषण कार्यक्षेत्रात येणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायतीमधील रुग्णांना मोफत उपचार मिळावा. कौशल्य, अथवा शैक्षणिक पात्रता असलेले कर्मचारी कंपनीत लागतील त्याची माहिती द्यावी. तसेच, स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी पुरोगामी युवक संघटना, अलिबाग तालुका प्रमुख विक्रांत वार्डे यांनी केली आहे.

Exit mobile version