40 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस द्या; शास्त्रज्ञांनी केंद्राकडे केली शिफारस

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, भारतातील सर्वोच्च शास्त्रज्ञांनी देशातील 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्यावा, अशी शिफारस केली आहे. प्रमुख भारतीय जीनोम शास्त्रज्ञांनी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य देऊन कोरोना लसीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. भारतीय SARS-COV-2 जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) च्या साप्ताहिक अहवालामध्ये ही शिफारस करण्यात आली आहे. आयएनएसएसीओजी हे कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे. आयएनएसएसीओजीच्या प्रमुख शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, ज्या लोकांचे लसीकरण केले गेले नाही अशा लोकांना जास्त धोका असतो आणि त्यांनी आधी लसीकरण केले पाहिजे. तसेच 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा विचार केला पाहिजे. यामध्ये उच्च जोखीम आणि उच्च धोका असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाऊ शकते. देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान खासदारांनी कोव्हिड लसींच्या बूस्टर डोसच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे.

Exit mobile version