ज्येष्ठांसह मुलांना रेल्वे तिकिटात सवलत द्या!

। कर्जत । वार्ताहर ।
कोरोना महामारीपूर्वी रेल्वे प्रवास करताना तिकिटात जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जी सवलत होती, तीसुद्धा पुन्हा सुरू करावी. शिवाय, अनेक समस्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन दिले व विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
रेल्वे प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक महिलांना 50 टक्के सवलत मिळत असे व लहान मुलानासुद्धा सवलत मिळत असे. तर ज्येष्ठ नागरिक पुरुषांना 40 टक्के सवलत मिळत असे. मात्र, रेल्वे प्रशासनाने मार्च 2020 पासून कोरोनामुळे ही सवलत बंद केली होती. कारण, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले कमीत कमी प्रवास करू शकतील, हा हेतू होता. आता कोरोना आटोक्यात आल्यानंतरसुद्धा सवलत द्यायला सुरुवात केली नाही. ही बाब जेष्ठ नागरिक प्रवाशांनी पंकज ओसवाल यांच्या निदर्शनास आणली. ही सवलत पुन्हा सुरू व्हावी यासाठी ओसवाल यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली व त्यांच्याशी याबाबतीत सविस्तर चर्चा केली. यावेळी नगरसेवक विवेक दांडेकर, माजी नगरसेवक संतोष पाटील उपस्थित होते.

Exit mobile version