कोटनाका रेल्वे प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या

कृती सेवा संस्थेची मागणी, कार्यालयाचा उद्घाटन
। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरिता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरित्या संपादित करण्यात आली. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही, ती तातडीने दिली जावी आणि प्रलंबित समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात अशी मागणी कृती सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.


कोटगाव प्रकल्पग्रस्त रेल्वे कृती सेवा संस्था (रेल्वे कमिटी उरण) व कोटगाव ग्रामसुधारणा मंडळ यांच्या संयुक्त कार्यालयाचे उदघाटन शिव मंदिरासमोर, रेल्वे स्टेशन कोटनाका येथे जेएनपीटीचे विश्‍वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामचंद्र म्हात्रे, कैलास भोईर, नवनीत भोईर, निलेश भोईर, सुनिल भोईर, योगेश गोवारी, नरेश रहाळकर, रवीशेठ भोईर, डी. के. सिंग, महादेव यादव, दीपक भोईर, सुरज पाटील, सुभाष गोवारी, शंकर भोईर, सुभाष भोईर, कृष्णा जोशी, देविदास गोवारी, हेमदास गोवारी, सुनिल पाटील, राजेश भोईर, महेश कोळी, भालचंद्र कोळी यांच्यासह कोटगाव प्रकल्पग्रस्त रेल्वे कृती सेवा संस्था (रेल्वे कमिटी उरण) व कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी भूषण पाटील म्हणाले की, स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या लढाईत मी नेहमी भूमीपुत्रांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी असतो. कोटनाका रेल्वे कमिटीच्या सर्व मागण्या योग्य व रास्त असून त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. स्थानिक भूमीपुत्रांना त्यांचे न्याय हक्क मिळालेच पाहिजे, असे सांगत मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.

रेल्वेने 1962 मध्ये 105 शेतकऱ्यांकडून 11 महिन्यासाठी भाडे तत्वावर जागा घेऊन लेखी करार केले होते. त्या आधारावर रेल्वेने 7/12 वर रेल्वेचे नाव टाकून दिले पण पेमेंट केले नाही. पेमेंट केले तर आम्हाला अवॉर्ड कॉपी दाखवा. याबाबत शेतकर्‍यांची कृती सेवा संस्थाची बाजू न्यायाची, सत्याची असल्यामुळे आम्ही सर्वजण याबाबत मुंबई हायकोर्टात केस दाखल केली आहे. न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे, असे शेतकर्‍यांच्या वतीने कोट गाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेचे अध्यक्ष नवनीत भोईर यांनी यावेळी सांगितले. उरण काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरूच असून सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची मागणी येथील उपोषणकर्त्यांनी केली आहे.


सविस्तर वृत्त असे की, उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरिता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरित्या संपादित करण्यात आल्या. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकर्‍यांनी 27 नोव्हेंबर 2020 पासून कोटनाका येथे रेल्वे प्रकल्पाचे काम बंद करत साखळी उपोषणाला सुरूवात केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण असेच सुरु राहणार असल्याचे मत नवनीत भोईर, योगेश गोवारी, निलेश भोईर यांनी व्यक्त केले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Exit mobile version