| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, पहिल्याचा दिवशी सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत.
राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून, त्यांना केंद्राने तत्काळ मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्र आणि बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. काही जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रसह नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील हवालदील झाला आहे, असे त्या म्हणाल्या.