मुरूडनंतर चौलमध्ये मोटारसायकलस्वार खड्ड्यात पडून गंभीर
ठेकेदाराचा निष्काळजीपणा उघड, स्थानिकांमधून संताप व्यक्त
। रेवदंडा । विशेष प्रतिनिधी ।
मागील महिन्यात मुरूड येथे वनरक्षक सूरज सारंगे यांचा रस्त्यातील खोदलेल्या खड्ड्यात मोटारसायकलसह पडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला होता. त्या घटनेची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच चौल-वावे मार्गावर तसाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे उघड्या ठेवलेल्या आठ ते दहा फूट खोल खड्ड्यात मोटारसायकल कोसळून 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याचा जीव धोक्यात आहे.
चौल चौकी ते वावे रस्त्याच्या कामात सुरू असलेल्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौल (भोवाळे) बीबी गावाजवळ मोरीसाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात सागवाडी येथील रामनाथ जगन्नाथ फसाळा (30) हे त्यांच्या दुचाकीसह कोसळले. या अपघातात त्यांच्या शरीरात लोखंडी रॉड घुसल्याने हनुवटी, ओठ, कपाळ, नाक व तोंडावर गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांच्यावर सध्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. ना बॅरिकेट्स, ना सूचना फलक, ना प्रकाशयोजना. त्यामुळे रामनाथ यांना हा खड्डा दिसून आला नाही, असे सांगितले जाते. ठेकेदारांनी मूलभूत सुरक्षेचे नियमही पाळले नाहीत, यामुळेच हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
याप्रकरणी फिर्यादी जयश्री जगन्नाथ फसाळा यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात आर.के. मदानी अँड कंपनी आणि एस. महेश्वरी अँड कंपनी (मुंबई) या ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, हा एकच अपघात नसून, संपूर्ण मार्गावरील अर्धवट कामे, संथ गती, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. वाहतूक कोंडी वाढत असून, पोलिसांनाही दिवस-रात्र उन्हात-धुळीत उभे राहून वाहतूक नियंत्रण करावी लागत आहे, त्यामुळे त्यांच्यावरही ताण वाढत आहे.
योग्य नियोजन आणि सुरक्षेची काळजी घेतली असती, तर असे अपघात टाळता आले असते. आता मात्र ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिक आणि पोलिसांना बसतो आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहेत.
यापूर्वीही रस्त्यांवरील खड्डे, अर्धवट कामे आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यात आला होता. तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने पुन्हा एकदा जीवघेणा प्रकार घडला आहे.
या घटनेने ठेकेदारांचा निष्काळजीपणा समोर आला असून, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधितांवर कडक कारवाई करावी आणि रस्ते सुरक्षित करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, आणखी निरपराध जीव या खड्ड्यांच्या सापळ्यात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







