शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
। पाली । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यात विशेष महत्व प्राप्त असलेल्या बुध्दकालीन लेण्या अस्तित्वात आहेत. लेण्या पाहण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक तसेच लेणी संवर्धक येत असतात. त्या लेण्यांचे संवर्धन व जतन करणे, लेण्यांवरील बुद्धांचे विद्रुपीकरण थांबवणे तसेच बुद्धांचे अस्तित्व टिकविण्याचे काम लेणी संवर्धक व बौद्ध अनुयायंकडून केले जात आहे. याच संकल्पनेतून सुधागड तालुका बौद्धजन पंचायत (मुंबई) या संस्थेच्या तालुका महिला मध्यवर्ती कमिटीच्या अध्यक्षा अस्मिता अविनाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि.31 मार्च रोजी लेणी स्वच्छता व संवर्धन मोहीम सुधागड तालुक्यातील गोमाशी येथे राबविण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी लेणीवर साफसफाई केली. लेणीच्या आजूबाजूचे सुकलेले गवत व कचरा साफ केला. यामधून विद्यार्थ्यांना बुद्धकालीन ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घडले. यामध्ये प्रामुख्याने कॉलेजमधील मुला-मुलींसह शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी सुधागड तालुका मध्यवर्ती कमिटीचे माजी सचिव राजेश प्र. गायकवाड, महिला मध्यवर्ती कमिटीच्या सचिव निता कांबळे, प्रियंका ठवरे, किरण कांबळे, अविनाश कांबळे, ग्रुप नं ७च्या सचिव साक्षी कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत उपस्थित राहून सहभाग घेतला. दरम्यान, पुढील मोहीम अधिक जोमाने विद्यार्थ्यांसह दुसऱ्या लेणीवर राबविण्यात येणार असल्याचे अस्मिता कांबळे यांनी यावेळी सांगितले.







