। उरण । प्रतिनिधी ।
उरण मतदार संघात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. हा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी मला आमदार होण्याची एक संधी द्या. त्या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवीन, अशी ग्वाही उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी दिली.
प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचार दौर्याचा झंझावात तालुक्यात सुरू असून, गुरुवारी (दि.14) उरण पूर्व विभागातील पुनाडे, चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, खोपटे, गोवठणे, तसेच या भागातील अन्य गावांना भेटी देऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी ते चिरनेर येथे झालेल्या छोटेखानी सभेत मतदारांशी बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, मी निवडून आल्यावर मला कमिशन खायचे नाही किंवा आमदार म्हणून गाडीवर पाटी लावायची नाही. तर, येथील तरुण वर्ग माझ्या प्रचारात, कुठल्याही पक्षाचा विचार न करता एकवटला असून, त्यांच्या भवितव्यासाठी मला काम करायचे आहे. येथील तरुणांना प्रशिक्षणाअभावी नोकर्या मिळू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. यातून त्यांना नोकरीची संधी मिळेल. गरीब गरजू आणि सर्वच लोकांसाठी मला काम करायचे आहे. गरिबांच्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत, त्या पूर्णत्वास नेण्याचा माझा मानस आहे.
गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारांनी आम्हीच निधी आणला, आम्हीच विकास कामे केली, असा डांगोरा पिटला. तसेच, विद्यमान आमदारांची जीभदेखील घसरत चालली आहे. ते येथील आगरी, कोळी, कराडी समाजाबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. याची चीड येते. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या विरोधात तालुक्यात प्रचंड नाराजी आहे. ही घमेंड, मस्ती आता आपल्याला सर्वांनी मिळून, उतरवायची असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी रमाकांत पाटील, शुभांगी पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, प्रफुल्ल खारपाटील, दीपक कातकरी, अनिल पवार, अरुण शिंदे, प्रशांत खारपाटील, अनंत नारंगीकर, प्रदीप पाटील, राजू ठाकूर, अमित मुंबईकर, दामोदर मुंबईकर, प्रदीप ठाकूर, भास्कर ठाकूर, अजित म्हात्रे, पद्माकर ठाकूर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.