शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
| कोर्लई | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मेढेखार व कालवडखाडी येथील शेतकरी संघटनेच्याजवळजवळ 380 शेतकऱ्यांच्या पटनी एनर्जी व इतर नऊ कंपन्यांनी 18 वर्षांपूर्वी अल्प दरात घेतलेल्या जमिनी ताब्यात द्याव्यात, या मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 सप्टेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व उपोषण करणार आहे. याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या शेतकरी संघटनेच्या जवळ जवळ 380 शेतकऱ्यांच्या जमिनी में पटणी एनर्जी व इतर नऊ कंपन्या अशा एकूण 10 कंपन्यांनी सुमारे 18 वर्षांपूर्वी अत्यंत कमी भावात खरेदी केलेल्या आहेत. त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना 50 टक्के एवढीच रक्कम मिळाली आहे, तर काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकलेल्या नसतानासुद्धा त्या कंपन्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे इतर लोकांच्या जमिनीसुद्धा ओसाड व खराब झालेल्या आहेत. जमिनी खरेदी करताना या सर्व कंपन्यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या ठिकाणी शेतीविषयक मालाचे व इतर प्रकल्प उभारण्यात येऊन शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना सदर प्रकल्पात नोकऱ्या देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु, दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाहीत. त्यामुळे येथील अन्यायग्रस्त स्थानिक शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना रोजगार मिळणे तर सोडाच; परंतु खरेदी केल्यापासून या सर्व जमिनी खाडीलगत असल्यामुळे आजपर्यंत येऊन गेलेले महापूर व मोठमोठ्या समुद्राच्या भरत्या यामुळे जमिनी अस्तित्वात राहिल्या नाहीत. त्यामुळे याठिकाणी फार मोठे मँग्रोजचे जंगल निर्माण झालेले आहे. प्रकल्प उभारले नाहीत. तसेच जमिनीची मशागत राखली गेली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मुलांना व नातेवाईकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, सर्वत्र बेरोजगारी वाढलेली आहे. शेतकऱ्यांवर गरीबी व उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच या धक्क्यामुळे व दु:खामुळे अनेक शेतकरी अकाली मृत्यू पावले आहेत.
दरम्यान, जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर पुन्हा करून देण्यासाठी किंवा जमिनीत प्रकल्प उभारण्यासाठी येथील सर्व शेतकरी गेली 15 ते 16 वर्षांपासून सातत्याने कायदेशीर संघर्ष करीत आहेत, परंतु शासन व प्रशासनाकडून तसेच जमिनी खरेदी करणाऱ्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. यामुळे अखेर नाईलाजास्तव शेतकरी संघटनेने दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.







