। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील तांबडमाळ येथे एक सात फुट लांब अजगर आला होता. या अजगराने कोंबड्याची शिकार करून त्याला फस्त केले व यानंतर तो लाकडाच्या सरपणात शिरला होता. या अजगराला पालीतील सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी सर्पमित्र चांद शेख यांच्या मदतीने पकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप जंगलात सोडले आहे. दरम्यान, अजगराला पाहून वाडीतील ग्रामस्थ प्रचंड घाबरले होते. मात्र, सर्पमित्र येताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच, वाडीवर अजगर आल्याची माहिती वनविभाग कर्मचारी मारोती मुंडे यांनी फोन करुन सर्पमित्रांना दिली. या अजगराला सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी सर्पमित्र यांच्या सोबत वनविभागाचे कर्मचारी व राजेश रुईकर हे होते. अजगराला पकडत असताना पाहण्यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.