। पनवेल । वार्ताहर ।
श्रेयस दिपक पराडकर याने मंड्या कर्नाटक येथे 31 मार्च ते 4 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या जलतरण राष्ट्रीय अजिंक्यपद स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅटट्रिक लगावली आहे. या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 13 राज्यातील स्पर्धकांचा सहभाग होता. श्रेयसने 50 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर बटरफ्लाय आणि 25-4 मीटर फ्रीस्टाईल रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
या अगोदर नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत श्रेयसने दोन गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्र राज्यातर्फे नॅशनल स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आणि नक्कीच त्या पात्रतेचा गौरव त्यानी मांड्या कर्नाटक येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक लगावून महाराष्ट् राज्यसाठी सार्थकी लावला. पुढील तीन वर्षे श्रेयससाठी अत्यंत महत्वाची आहेत कारण अशीच कामगिरी त्यानी येत्या तीन वर्षात बाहेरील राज्यात होणार्या राष्ट्रीय स्पेशल जलतरण स्पर्धेत बजावली तर तो आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेसाठी निवडला जाऊ शकतो. तसेच, देशाचे स्पेशल जलतरण स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी त्याला प्राप्त होऊ शकते. श्रेयसच्या या दैदिप्यमान, अभिमानास्पद आणि गौरवाशाली यशामागे त्याचे पालक जे. एम. राठी, जलतरण तलाव मार्गदर्शक भुषण शिर्के, माजी मार्गदर्शक तावडे, मेहेंदळे हायस्कुल रोहा येथील सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक, मित्रपरिवार, प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा रोहा येथील अध्यक्ष व शिक्षकवर्ग आणि स्पेशल भारत ऑलिम्पिक सर्व मार्गदर्शक आणि शुभचिंतक या सर्वाचा महत्वाचा सहभाग आहे.
या स्पर्धेसाठी कुमार श्रेयस हा एकटा पालकांच्या मदतीशिवाय दोन मार्गदर्शक सुनील आडे आणि कांचन बडवे यांच्या सहाय्याने कर्नाटकात जाऊन स्पर्धेत सहभागी झाला. स्पेशल मुलांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्पेशल ऑलिम्पिक भारत या संस्थेची अशी काही बंधनकारक मार्गदर्शन तत्वे आहेत.