शेतीच्या नुकसानीचे जागेवर जाऊन पंचनामे करा

शेकाप नेते पंडित पाटील यांची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकार्‍यांनी शेतात जाऊन वस्तूनिष्ठ पंचनामे करुन शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.
रायगड जिल्हा गेले दोन वर्षे सातत्याने अनेक आपत्तीतून जात असताना काल तर पावसाने कहर केला. जून जुलै सारखा पाऊस कोसळला. मात्र ना कृषी विभागाचे अधिकारी ना महूसल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी देखील शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करायला फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. काही शेतकर्‍यांचे पंचनामे केले. तर अनेकांना नुकसानीचे फोटो काढुन पाठवायला सांगितले. मात्र अनेक शेतकर्‍यांकडे चांगले मोबाईल नाहीत. त्यामुळे फोटो काढणार कसे आणि ते पाठवणार कसे असे प्रश्‍न शेतकर्‍यांना पडले आहेत. अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करणे योग्य नाही. भात कापून तो रचून उडवी शेतात रचून ठेवली होती. मात्र पावसात भिजल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी तात्काळ जागेवर जाऊन शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची शेकाप युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. आणि ग्रामस्थांची विचारपूस केली.
यावेळी शेतकर्‍यांनी आतापर्यंत तलाठी आणि कृषी अधीका-यानी 17 तारखेला पडलेल्या पावसात ठरावीक शेतकर्‍यांचे पंचनामे केले. परंतु आजच्या पावसाने सर्व शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, तरी तहसीलदारांनी सरसकट पंचनामे करावे अशी मागणी केली आहे. काही शेतकर्‍यांनी भावना व्यक्त करताना पहिल्या पावसाचेही पंचनामे मालाडे, राजेवाडी, महान या विभागात झाले नाही तर मग कृषी अधिकारी आणि यंत्रणा काय करत आहेत असा सवाल केला.

Exit mobile version