रिलायन्स पाईपलाईन नुकसानग्रस्तांना भरपाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या मागणीची दखल घेत रिलायन्सच्या केमिकलयुक्त सांडपाण्याची पाईप लाईन लिकेज झाल्याने शिहू – बेणसे परिसरातील शेतकर्यांचे नुकसान झाले असल्याने, त्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केल्यानंतर शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात नुकसानभरपाई जमा करावी, असे आदेश अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी दिले. नव्याने टाकण्यात येणारी पाईप लाईन ही बाहेरकाठयाच्या बाहेरुन किंवा एमआयडीसी रस्त्याजवळून घेण्यात यावी अशी मागणी देखील पंडित पाटील यांनी यावेळी केली.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व रिलायन्स कंपनीचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली असून लिकेजमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग, महसूल विभागाच्या मदतीने केले जाणार असून शेताच्या मधोमध असलेली पाईपलाईन अन्य जागेतून घेण्यात यावी अशी सुचना प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबत कंपनीच्या अधिकार्यांशी बोलून तातडीने निर्णय घ्यावा अशी सुचना देण्यात आली. यावेळी माजी आमदार पंडित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, शेकाप पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघाचे चिटणीस प्रसाद भोईर, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशीक अधिकारी रा.स. कामत, खारभुमी सर्वेक्षण विभागाचे उपकार्यकारी अभियंता जगदिश पाटील, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, रोहाच्या तहसीलदार कविता जाधव, अलिबाग तहसिलदार मीनल दळवी, रिलायन्स कंपनीचे अधिकारी श्रीकांत गोडबोले, मिलींद कुलकर्णी, रमेश धनावडे, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागोठणे परिसरात असलेल्या रिलायन्स कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी पाईपलाईन द्वारे शेतकर्यांच्या शेतातून काढण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष जूनी असलेली ही पाईप लाईन लिकेज झाली आहे. त्यामुळे केमिकलयुक्त सांडपाण्याचा दुर्गंध पसरत असताना भात पिकांवरही त्यांचा परिणाम होत आहे. जमीन नापिक होण्याची भिती निर्माण झाली आहे. ही बाब शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न सोडविण्याबाबत बैठक घेण्याची मागणी केली. शेतकर्यांच्या या समस्येचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने बुधवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठकीचे आयोजन केले.
अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाने शेतकर्यांची व कंपनीच्या अधिकार्यांची बाजू ऐकून घेतली. शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार पंडित पाटील यांनी केमिकल युक्त पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भिती असून शेतीचेदेखील नुकसान झाले आहे. तयार झालेले भात पिक या पाण्यामुळे खराब होऊन शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याबाबत जाणीव करून दिली. जागेचे नमुने घेणे, पंचनामे करणे, शेताच्या मधोमध असलेली पाईपलाईन अन्य जागेतून घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शेतकर्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी असे ही सांगण्यात आले. या मागणीला दुजोरा देत प्रशासनाने कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचनामे केली जातील. प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून जागेचे नमुने पाहिले जातील असे आश्वासन देत शेतकर्यांच्या मागणीनुसार पाईपलाईन अन्य जागेतून घेण्याचा निर्णय कंपनीने घेण्याबाबत ठरवावे तसेच भरपाई ही ऑनलाईन पध्दतीने करावी अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. यावेळी कंपनीच्या अधिकार्यांकडून या अंमलबजावणीबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
जेएसडब्ल्यूच्या गैरहजेरीमुळे नाराजी
वडखळ-डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रदुषणाबाबात देखील आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करयात आली होती. कंपनीच्या प्रदुषणामुळे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे यावेळी पंडित पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांच्या तक्रारीनुसार आयोजित केलेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असताना कंपनीने एका अधिकार्याला पाठविल्याने इतर सक्षम अधिकारी बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने अप्पर जिल्हाध्किारी अमोल यादव यांनी सदर बैठक स्थगित केली. जेएसडब्ल्यू कंपनीच्या या वर्तवणूकीबाबत पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
रिलायन्सच्या पाईपलाईनमुळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण महसूल आणि कृषी विभागाने करुन त्यानुसार होणार्या नुकसानीची भरपाई शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावी ही आमची मागणी प्रशासनाने मान्य केली आहे. तसेच नव्याने टाकण्यात येणारी पाईप लाईन ही बाहेरकाठयाच्या बाहेरुन किंवा एमआयडीसी रस्त्याजवळून घेण्यात यावी. जेणेकरुन सांडपाण्यामुळे शेतकर्यांच्या जमीनीचे मोल कमी होणार नाही आणि नुकसानभरपाईचा प्रश्न वारंवार येणार नाही.
पंडित पाटील
माजी आमदार शेकाप