महापुरानंतर माणसांमधला देव दिसला : प्रशांत यादव

। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष साजिद सरगुरोह व मित्र परिवार यांच्यातर्फे, चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत करणार्‍या दानशूर संस्था आणि व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना, देवाच्या मूर्तीचे दर्शन नित्याने घडत असते. पण महापुरानंतर माणसांमधला देव दिसला, असे प्रतिपादन काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.
याप्रसंगी पुढे संवाद साधताना ते म्हणाले की, महापुरात अनेकांचे व्यवसाय, संसार उध्वस्थ झाले. शासन, प्रशासन पोहचू शकले नाही, तिथे या दानशूर संस्था आणि व्यक्ती पोहचल्या. शहर, तालुका, जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील सामाजिक, धार्मिक संस्था आणि व्यक्तींनी पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी प्रयत्न केले. जात-पात-धर्म न पाहता प्रत्येक समाजातील संस्था आणि व्यक्तींनी केवळ मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांची सेवा केली. यादरम्यान, केवळ संकटातच नव्हे तर नेहमीच अशी एकीची भावना सर्वांच्या मनात कायम राहावी, असे आवाहन करत मदत करणार्‍या सर्वांसाठीच, पूरग्रस्तांच्या मदतीने असे हजारो देव उभे राहिले असून आज या सर्वांचे दर्शन घेण्याची आणि त्यांचे ऋण व्यक्त करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे गौरवोद्गार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी काढले.
या सत्कार समारंभात चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत करणार्‍या पुणे, मुंबई, रत्नागिरी, चिपळूण, गोवळकोट, सावर्डे येथील सामाजिक संस्था आणि व्यक्तींचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर श्री. यादव यांच्यासह चिपळूण तालुका मुस्लिम समाजाचे उपकार्याध्यक्ष यासीन दळवी, काँग्रेसचे चिपळूण-संगमेश्‍वर मतदार संघाचे युवक अध्यक्ष महेश कदम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर, प्रास्ताविक काँग्रेसचे चिपळूण तालुका उपाध्यक्ष साजिद सरगुरोह तर साजिद सरगुरोह यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैसल पिलपिले, गुलजार कुरवले, रुपेश आवले, राकेश दाते, ऋषिकेश शिंदे, निर्मला जाधव, जरीन रुमाणे, समरीन सरगुरो, दीक्षा माने, आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version