| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दहा दिवसाच्या मनोभावेसेवेनंतर दुर्गा मातेला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी (दि.2) निरोप देण्यात आला. ग्रामीण व शहरी भागात सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीच्यावेळी पाऊस पडत असतानाही त्याकडे दूर्लक्ष करीत विसर्जन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. एक हजार 387 दुर्गा मुर्तींचे विसर्जन तलाव, नदी व समुद्रात करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये देवींचे स्वागत करण्यात आले होते. सोमवारी (दि.22) पासून जिल्ह्यात नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला. सकाळी विधीवत पुजा करून पाच हजार 106 ठिकाणी घट स्थापन करण्यात आले. एकूण एक हजार 387 मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात गावागावात नाक्यानाक्यावर नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. दांडिया, गरबासह वेगवेगळे उपक्रम या कालावधीत घेण्यात आले. आरोग्य विषयक उपक्रमांसह खेळाच्या स्पर्धा तसेच भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांसाठीदेखील पैठणीसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
काही ठिकाणी जाखडी हे पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे दहा दिवस मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. दरम्यान अतिवृष्टी झाल्याने अनेकांच्या आनंदावर विरजन ही पडले. तरीदेखील त्यावर मात करीत पावसापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. गुरुवारी (दि.02) ऑक्टोबरला दुर्गा विसर्जनासह विजयादशमी(दसरा) साजरा आला. सकाळी विधीवत पुजा करून नवनवीन कपडे परिधान करून देवीची आरती घेण्यात आली. त्यानंतर स्थापन केलेले घट काढण्यात आले. सायंकाळी दुर्गा मुर्तीच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली. गावासह शहरी भागातून देवीच्या मुर्तीची खालूबाजासह ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेकांनी सहभागी होऊन आनंद साजरा केला. दरम्यान सायंकाळी पाच नंतर ढगाळ वातावरण सुरु झाले. सहानंतर पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे मिरवणूकीच्यावेळी अनेकांची धावपळ उडाली. अखेर पावसात भिजत अबालबृध्द मिरवणूकीत सहभागी होऊन नाचत होते. एक हजार 387 दुर्गा मुर्ती आणि 192 प्रतिमांचे विसर्जन नदी, तलाव, समुद्रात रात्री उशीरापर्यंत करण्यात आले. काही ठिकाणी सायंकाळ साडेसात वाजेपर्यंत विसर्जन झाले. तर काही ठिकाणी रात्री दहापर्यंत विसर्जन करण्यात आले.
दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा उत्साहात
