सलग पाच सेटच्या झुंजीनंतर जोकोविचला दुखापत
| फ्रान्स | वृत्तसंस्था |
फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये मंगळवारी मानांकित खेळाडूंची वाटचाल कायम राहिली. प्रथम मानांकित इगा स्विअतेक व तिसरी मानांकित कोको गॉफ यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन करीत महिला एकेरी विभागाची उपांत्य फेरी गाठली.
कोको गॉफ हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ओन्स जॅब्यूएर हिच्यावर 4-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर गॉफ हिने दबावाखाली आपला खेळ उंचावत अंतिम चारमध्ये वाटचाल केली. गॉफ सलग तिसर्यांदा ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तिने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याचा मान संपादन केला होता. त्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात तिने ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली आणि आता फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात तिला यश लाभले आहे. जेतेपदाच्या हॅट्ट्रिकच्या दिशेनेपोलंडच्या इगा स्विअतेक हिनेही मार्केटा वांड्रोसोवा हिला सहज नमवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. इगा हिने मार्केटा हिच्यावर 6-0, 6-2 अशी मात करीत पुढे पाऊल टाकले. इगा हिने आता फ्रेंच ओपन स्पर्धा सलग तिसर्यांदा जिंकण्याकडे वाटचाल केली आहे. याआधी इगा हिने 2022 व 2023 या वर्षामध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती.
दोन पाच सेटच्या थरारानंतर विजयअव्वल मानांकित आणि गतविजेता नोवाक जोकोविच याला सलग दोन फेर्यांमध्ये पाच सेटच्या थरारानंतर विजयाला गवसणी घालता आली. शनिवारी मध्यरात्री तिसर्या फेरीच्या लढतीत लोरेंझो मुसेटी याच्यावर पाच सेटच्या झुंजीनंतर विजय मिळवल्यानंतर जोकोविचला सोमवारी मध्यरात्री पुन्हा पाच सेटचा सामना करावा लागला. जोकोविच याने फ्रान्सिस्को सिरनडोलो याचे कडवे आव्हान 6-1, 5-7, 3-6, 7-5, 6-3 अशा पाच सेटमध्ये परतवून लावले. पहिला सेट जिंकल्यानंतर जोकोविचवर पुढील दोन सेट गमावण्याची आपत्ती ओढवली होती, पण यामधून बाहेर येत त्याने चौथा व पाचवा सेट आपल्या नावावर केला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, मात्र आता तो उपांत्यपूर्व फेरीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जोकोविचच्या गुडघ्याला दुखापत झाली असून यामधून तो बाहेर येतो की नाही, याचे उत्तर लवकरच मिळेल.







