रायगड किल्ल्यावर जाताय? मग जाताना काय करायचं जाणून घ्या…

रोप वे ठरतोय आधार; हंगाम नसतानाही पर्यटकांची गर्दी वाढतेय

| रायगड | प्रतिनिधी |

हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाचा ऐतिहासिक लौकिक आजही टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी कोट्यवधी शिवभक्त आणि पर्यटक किल्ले रायगडावर येऊन इतिहासाचा मागोवा आणि ललाटी पावन मातीचा टिळा लावतात. सध्या पर्यटन हंगाम नाही तरी देखील किल्ले रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी पर्यटकांची पावले किल्ले रायगडाच्या दिशेने वळली आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेतच पण रोप वे हा पर्याय उत्तम आधार ठरला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे ने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पायरी मार्गाने हजारो पर्यटक दिवसभरात किल्ल्यावरून खाली उतरतात. परंतु रोप वे ने दिवसाला दोन हजार पर्यटक किल्ले रायगडावर जाऊन परत येतात.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात किल्ले रायगड इतिहासाची साक्ष देत उभा आहे. वर्षभरात किल्ले रायगडावर शिवजयंती, शिवराज्याभिषेक असे महत्वाचे कार्यक्रम शासन करते. यावेळी किल्ल्यावर देश विदेशातून शिव भक्तांची मांदियाळी जमा होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा किल्ले रायगड पाहण्यासाठी येणारे शिवभक्त आणि पर्यटक खासगी वाहनाने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहचतात. मुंबई पुणे, डोंबिवली, कोल्हापूर, नाशिक आदी ठिकाणाहून पर्यटक किल्ले रायगडाला भेट देतात. काही पायऱ्यांनी चढून किल्ल्यावर जातात तर काही रोप वे चा आधार घेतात. किल्ले रायगडच्या पायथ्याशी रोप वे ची यंत्रणा उभारण्यात आली आहे. एका दिवसात रोप वे सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यटकांना किल्ल्यावर घेऊन जाणे आणि किल्ल्यावरून परत खाली आणते.

310 रुपये रिटर्न तिकिट
रोप वे ने किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याला रोप वे चे तिकीट काढावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यावर रोप वे चे तिकीट काढता येते. रोप वे चे तिकीट बुकिंग करण्यासाठी रोपवे व्यवस्थापनाने raigadropeway.com हे संकेतस्थळ दिले आहे. काही पर्यटक या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करतात. रोप वे चे तिकिट 310 रुपये रिटर्न आहे.

दोन तासांचा पायी प्रवास
किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग अवलंबला तर पावणेदोन तास जाण्यासाठी लागतात. किल्ला उतरण्यासाठी देखील तितकाच वेळ लागतो. परंतु रेपो वे ने किल्ल्यावर जाण्याचे ठरविले तर पाच मिनिटात किल्ल्यावर पोहचता येते. रोप वे दिवसभरात दोन हजार पर्यटकांना किल्ल्यावर नेऊन परत आणते. रोप वेचे दोन वे असल्याने एका वेळेला 18 पर्यटकांना वर जाता येते. याच वेळी 18 पर्यटक खाली उतरतात. रोप वे कडे सहा ट्रॉली आहेत. जाण्यासाठी तीन आणि येण्यासाठी तीन ट्रॉलीचा वापर केला जातो.

खासगी वाहन ठरेल सोयीचे
किल्ले रायगड मुंबईपासून 200 किमी, पुण्यापासून 140 किमी, कोल्हापूरपासून 300किमी, नाशिकपासून 270 किमी, अंतरावर आहे. तसेच महाडपासून 50 किमी अंतरावर रायगड किल्ला असल्याने येथे जाण्यासाठी खासगी वाहने पर्यटकांना सोयीची ठरतात. किल्ल्याच्या पायथ्याशी नाश्ता आणि जेवण्याची व्यवस्था असणारी दुकाने आहेत. रायगड किल्ल्यावर स्थानिकांनी पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची दुकाने सुरु केली आहेत. यामुळे पाणी आणि खाण्याच्या वस्तू किल्ल्यावर देखील उपलब्ध होतात. यामुळे पर्यटक रायगड किल्ल्यावर येणे अधिक पसंत करतात.

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे चा वापर पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थापनाने 60 कर्मचारी कार्यरत ठेवले आहेत. एका वेळेला 18 पर्यटकांना किल्ल्यावर नेणे आणि त्याचवेळी 18 जणांना खाली उतरवण्याचे काम केवळ पाच मिनिटात केले जाते. किल्ले रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा रोप वे मुळे वेळ वाचत असल्याने पर्यटकांची रोप वे साठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.

राजेंद्र खातू, व्यवस्थापक रायगड रोप वे
Exit mobile version