गोकुळाष्टमीचा कुंभारवाड्यात उत्साह

| पनवेल । वार्ताहर ।

कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यंदा गोकुळाष्टमी उत्साहात साजरी होणार आहे. एकीकडे गोविंदा पथकांच्या सरावाला वेग आला असून दुसरीकडे उत्सवासाठी लागणार्‍या रंगीत मडक्यांना मागणी वाढल्याने पनवेलमधील कुंभारवाड्यातदेखील रंगकामांना वेग आला आहे.

शहरातील कुंभारवाड्यात पारंपरिक मडकी बनवणार्‍यांची लगबग सुरू असून मडकी रंगवण्याच्या कामालादेखील वेग आला आहे. मागणी वाढल्याने यंदा गुजरात राज्यातील अहमदनगर, गांधीनगर येथून तयार मागवण्यात आलेल्या मडक्यांवर रंगकाम करून त्यांची विक्री करण्यात येत आहे.

मागणीत 15 ते 20 टक्के वाढ

कोरोनामुळे व्यवसायाला फटका बसला होता. त्यात यंदा मडके बनवणार्‍यांनी कमी प्रमाणात मडकी बनवली असून, माल मिळत नसल्याने मागणीनुसार मडकी पुरवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा मडक्यांच्या मागणीत 15 ते 20 टक्के वाढ झाली असून आकारानुसार 50 ते 90 रुपयांना विक्री केली जात आहे.

मडकी सजवण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. पूर्वी दहीहंडीसाठी लागणारी मडकी कुंभारवाड्यातच बनवली जात होती, पण सध्या कारागिरांचा अभाव असल्याने परराज्यांतून मडक्यांची आयात करावी लागत आहे.

ज्ञानेश्‍वर पनवेलकर,
मडकी विक्रेता
Exit mobile version