उंच उडीत आर्यन पाटीलला सुवर्णपदक

| माणगाव | प्रतिनिधी |

गुवाहाटी आसाम येथे रविवार (दि.13) पार पडलेल्या 37व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलॅटिक चॅम्पियनशीपमध्ये उंच उडी स्पर्धेत आर्यन अरुण पाटील सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत दि.7 जून रोजी पार पडलेल्या उंच उडी स्पर्धेत आर्यनला रौप्यपदक प्राप्त झाले होते. आर्यनला केंद्र शासनाची पाच लाख व राज्य शासनाची दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

आर्यन पाटील यांचे वडील अरुण पाटील हे वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, आई शिक्षिका आहे. आर्यनचे मूळ गाव रावे, ता. पेण, जि. रायगड हे असून, तो शालेय वयापासून उंच उडी खेळात त्याच्या एस.एस. निकम शाळेचे प्रतिनिधित्व करत होता. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर त्याने चांगली कामगिरी केली आहे. ओडिशा येथील स्पर्धेत आर्यनला सुवर्णपदक प्राप्त होऊन त्याने फ्रान्स या देशात आपल्या खेळाची उत्कृष्ट कामगिरी दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. आर्यन पाटील सध्या पिल्लई कॉलेज रसायनी येथे एफ.वाय.बी.एस.सी.मध्ये शिकत आहे. साई अकॅडमी मुंबईच्या माध्यमातून तो खेळतो आहे. प्रशिक्षक इंझमामूल हल यांचे उत्तम प्रशिक्षण त्याला लाभत आहे.

राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्याने सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळविली आहेत. त्यास नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलॅटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव शाळा समिती अध्यक्ष महादेव जाधव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पिल्लई कॉलेजच्या प्रिंसिपल, पिल्लई डायरेक्टर, क्रीडा, सामाजिक, शैक्षणीक व सांस्कृतिक क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे.

Exit mobile version