| सातारा | प्रतिनिधी |
साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश संपादन केले. त्याने युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावत संस्मरणीय कामगिरी केली. प्रतिष्ठेच्या स्पर्धेमधील रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिलाच तिरंदाज ठरला हे विशेष. पार्थला पहिल्या व दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली. महाराष्ट्राच्या या तिरंदाजाने तिसऱ्या फेरीत रिचर्ड के. याच्यावर 7-1 असा विजय साकारत पुढे वाटचाल केली. मुस्तफा ओझदेमिर याचे कडवे आव्हान पार्थ याने 6-5 असे परतवून लावत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
यांग केई हान याच्यावर पार्थ याने 6-4 असा विजय साकारला. पार्थ याने मथियास क्रेमर याला 6-4 असे पराभूत करीत अंतिम फेरीत पाऊल ठेवले. सुवर्णपदकाच्या लढतीत पार्थ याने साँग इंजुन याला 7-3 असे नमवत पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय तिरंदाजांनी यूथ जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये एकूण 11 पदकांची लयलूट केली. यामध्ये सहा सुवर्ण, एक रौप्य व चार ब्राँझपदकांचा समावेश आहे. भारत एकूण पदकांच्या जोरावर अव्वल ठरला. पण गुणतालिकेत एकूण 10 पदके जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाला पहिले स्थान मिळाले. त्यांनी सहा सुवर्णपदकांसह चार रौप्यपदके पटकाविली. भारताच्या खात्यात दक्षिण कोरियाच्या तुलनेत कमी रौप्यपदके होती. त्यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर राहिला.