मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घेतली दखल; या सर्व धावपळीतही थ्रोबॉलचा सराव सुरू
| राँची | वृत्तसंस्था |
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत चार सुवर्णपदके जिंकणाऱ्या 29 वर्षीय थ्रोबॉलपटू अमरदीप यांच्यावर आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजी विकण्याची आणि कॅब चालवण्याची वेळ आली आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाची दखल घेत क्रीडा विभागाला तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
अमरदीप यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी 2015 मध्ये मलेशियातील एशियन ज्युनियर थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, 2017 मध्ये नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या इंडो-नेपाळ थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, 2019 मध्ये बंगळुरूतील साऊथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि 2026 मध्ये राँची येथे झालेल्या साऊथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे चार आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके मिळवूनही त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मात्र अपेक्षित सुधारणा झालेली नाही.
अमरदीप यांना 2015 मध्ये मलेशियात स्पर्धेसाठी जाण्यासाठी सुमारे 65 हजार रुपयांचे कर्ज घ्यावे लागले होते. झारखंड थ्रोबॉल असोसिएशननेही त्यांना काही प्रमाणात मदत केली होती. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत साधारण आहे. वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आईही डोक्यावर भाजीची टोपली घेऊन घरोघरी भाजी विकते, तर त्यांचा मोठा भाऊ फास्ट फूडचा स्टॉल चालवतो. सध्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अमरदीप राँचीतील अरगोडा चौक परिसरात भाजी विकतात, तर रात्री कॅब चालवतात. या सर्व धावपळीतही त्यांनी थ्रोबॉलचा सराव आणि देशाचे प्रतिनिधित्व करणे सोडलेले नाही. 2016 पासून प्रोत्साहन निधी आणि सरकारी नोकरीसाठी ते शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यासोबत खेळलेल्या काही खेळाडूंना इतर राज्यांमध्ये क्रीडा धोरणांतर्गत सरकारी नोकरी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
अमरदीप यांच्या परिस्थितीची माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी क्रीडा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. क्रीडामंत्री सुदिव्य सोनू यांनीही विद्यमान क्रीडा धोरणाच्या माध्यमातून अमरदीप यांना सरकारी नोकरी देता येईल का किंवा रोजगाराचा अन्य मार्ग उपलब्ध करून देता येईल का, याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आहे.
संघर्ष अन् ध्येयही कायम
आर्थिक अडचणी आणि रोजगाराचा प्रश्न कायम असतानाही अमरदीप यांनी खेळ सोडलेला नाही. ऑक्टोबरच्या अखेरीस श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते तयारी करत आहेत. देशासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीनंतर आर्थिक आणि रोजगाराची सुरक्षितता मिळावी, हा प्रश्न अमरदीप यांच्या संघर्षामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
