| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील वरसे हद्दीतील काळभैरव रेसिडेन्सी येथील शिवाजी वसाहतीमध्ये चोरीची घटना घडली आहे. येथील पहिल्या मजल्यावरील रूम नं. 1 मधील बंद फ्लॅटचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लोखंडी कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 22) पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
घरमालक बाहेरगावी गेल्यामुळे फ्लॅट बंद होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये गळ्यातील सोन्याचे छोटे मंगळसूत्र (अंदाजे रु.19,800), दोन ग्रॅम वजनाची छोटी अंगठी (रु.6,600), सोन्याचे दोन छोटे नट (रु.1,650), दोन ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची कर्णकुले (रु.15,400) तसेच तीन ग्रॅम वजनाची कानातील सोन्याच्या साखळीचा एक जोड (रु.15,600) असा एकूण सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या सूचनेनुसार सुरू आहे.
दरम्यान, परिसरात सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वरसे येथे घरफोडी; लोखंडी कडी तोडून दागिने लंपास
