साडेपाच लाखाची रोख रकमेसह दागिने लंपास
| रोहा | प्रतिनिधी |
घरातील मंडळी बाहेर गावी गेल्याने घरात कुणीही नाही या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने व अन्य किंमती दस्तऐवज चोरून नेल्याची घटना चणेरा-कोकबन मार्गावरील पारंगखार गावात घडली आहे. दरम्यान ग्रामीण भागात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थ वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारंगखार ता. रोहा गावातील तरुण प्रमोद प्रकाश शेळके हा सद्या नोकरी निमित्ताने सांताक्रूझ ( मुंबई) येथे राहत असून, 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान प्रमोद शेळके यांचे आई, वडील, पत्नी व भाऊ असे संपूर्ण शेळके परिवार घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोयंडे तोडून आत प्रवेश करुन कपाटातील लॉकरचा दरवाजा उपकून त्यातील साडे तीन लाख रुपयांची रोख रक्कम, मंगळसूत्र, हार, लहान मुलांच्या कानातील डूल, झुमके, अंगठ्या तसेच घरातील सदस्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत सोमवारी (दि.6 ) रोजी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचरण करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मपोहवा टेमकर पुढील तपास करीत आहेत.






