| खोपोली | प्रतिनिधी |
एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे लक्ष विचलित करून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन अनोळखी महिलांनी एका लहान मुलाच्या मदतीने पैसे पडल्याचा बनाव करून ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास पेण ते खोपोली असा प्रवास करणाऱ्या एसटी बसमध्ये ही घटना घडली. फिर्यादी प्रवास करीत असलेल्या एमएच-20 बीएल-3217 क्रमांकाच्या बसमध्ये दोन अनोळखी महिलांपैकी एक महिला फिर्यादी यांच्या सीटवर बसली होती. यावेळी तिच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाने हातातील चिल्लर फिर्यादी यांच्या सीटखाली टाकली. त्यानंतर पैसे उचलून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचे लक्ष विचलित करण्यात आले. याच संधीचा फायदा घेत महिलांनी फिर्यादी यांच्या बॅगेतील दागिन्यांच्या बॉक्समधून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार दबडे करीत आहेत.






