| मुंबई | प्रतिनिधी |
आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्याच दिवशी सोन्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा नवीन विक्रमी पातळी गाठली असून, वायदे बाजारात पहिल्यांदाच किंमती 91,000 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्पच्या दरवाढीची भीती सोन्याच्या किमतीला चालना देत आहे. अमेरिकेचे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ 2 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे जगातील उर्वरित देशांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वाटचाल करत आहेत. चालू वर्षात सोन्याच्या भावात 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या भावात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या भावात अशीच वाढ सुरू राहिल्यास दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस सोन्याचा भाव एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
आज सोन्याचा भाव 359 रुपयांनी वाढून 91,076 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान सोन्याचा भाव 683 रुपयांनी वाढला आणि 91,400 रुपयांच्या उच्चांकावर गेला. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या भावात 3400 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या एका महिन्यात सोन्याच्या भावात 5,239 रुपयांनी वाढ झाली आहे.
दुसरीकडे चांदीच्या भावातही वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, चांदीच्या किमतीत 500 रुपयांहून अधिक वाढ होत आहे. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान चांदीची किंमत देखील 1,00,975 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आठवडाभरात चांदीच्या भावात सुमारे 3,500 रुपयांची वाढ झाली आहे. तर एका महिन्यात चांदीच्या भावात 4,900 रुपयांची वाढ झाली आहे. चालू वर्षात चांदीच्या भावात 11,909 रुपयांची वाढ झाली आहे.