धरणामध्ये फक्त आठच मीटर जलसाठा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
तालुक्यातील 12 ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करणार्या उमटे धरणाने तळ गाठला आहे. या धरणामध्ये फक्त आठ मीटरच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा गावांमध्ये दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मे महिन्यात आठवड्यातून दोनच वेळा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये 1978-79 या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील 45 गावांतील सुमारे 60 हजारहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणामध्ये 54 मीटरपर्यंत जलसाठा उपलब्ध होता. मात्र, वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच पाण्याच्या अतिरेक वापरामुळे या धरणातील जलसाठा कमी होऊ लागला आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचा साठा कमी होत आहे. या धरणामधील 46 मीटर उंचीपर्यंतचा जलसाठा संपला आहे. त्यामुळे सध्या फक्त आठच मीटर जलसाठा शिल्लक असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.
धरणातील जलसाठा कमी होऊ लागल्याने पाण्याचा दुष्काळ गावांतील नागरिकांना जाणवू लागला आहे. अनेक गावे, वाडयांना दर दोन दिवसआड धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उमटे धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे या धरणातून गढूळ पाणी येत आहे. मे महिन्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महिन्यात आठवड्यातून दोनच वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे चार दिवसांतून एक वेळाच पाणी नागरिकांना मिळणार आहे.
गढूळ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
पंचेचाळीस वर्षे जुन्या असलेल्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पाणी कमी आणि गाळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गाळ काढण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरत असल्याने आजही येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जलजीवन योजना फेल
केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली. प्रति व्यक्ती 55 लीटर पाणीप्रमाणे पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. पाण्याचे स्त्रोत शोधून त्याद्वारे गावांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. अनेक गावांमध्ये योजना राबवून विहिरी, पाणी साठवण टाकी बांधण्यात आली. मात्र, आजही काही गावे पाण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणांमधून मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. त्याचा परिणाम ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जलजीवन योजनेसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, ही योजना फेल ठरल्याचा आरोप अनेकांकडून होत आहे.
उमटे धरणामध्ये फक्त आठच मीटर जलसाठा उपलब्ध आहे. धरणामधून पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. धरणाने तळ गाठल्याने गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे टीसीएल पावडरचा डोस वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या धरणांमधून दोन दिवसआड पाणी पुरवठा होत आहे. मे महिन्यात आठ दिवसांमध्ये दोनच वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींना याबाबत पत्र देऊन सूचना केल्या आहेत.
निहाल चवरकर, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग