ऑलिंपिकच्या तोंडावर गोल्डन बॉय नीरज चोप्राने घेतला मोठा निर्णय

। फ्रान्स । वृत्तसंस्था ।

भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्रा याने मंगळवारी रात्री झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये 85.97 मीटर अंतरावर भाला फेकत या स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि पॅरिस ऑलिंपिकआधी आत्मविश्‍वास कमावला. याप्रसंगी मात्र त्याने दुखापतीबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, या मोसमात दुखापतीमुळे मला अधिक स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. आता पॅरिस ऑलिंपिकनंतर माझे डॉक्टर बदलणार असून त्यांचा सल्ला घेणार आहे. दुखापतीवर कायमस्वरूपी उपचार करावयाचे आहेत. नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे मागील महिन्यात झालेल्या ओस्त्रावा गोल्डन स्पाईक या स्पर्धेमधून माघार घेतली. नीरजला मांडीच्या आतील भागातील स्नायूंचा त्रास होत आहे. या दुखापतीमुळे नीरजला यंदाच्या मोसमात अधिकांश स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली. नीरज पुढे नमूद करतो की, दरवर्षी मला अशा प्रकारच्या दुखापतीचा सामना करावा लागत आहे. ऑलिंपिकनंतर मी डॉक्टरांशी संपर्क साधून याबाबत सल्ला घेणार आहे, पण सध्या तरी मला स्पर्धेतील सहाही प्रयत्नांत भाला फेकता येत आहे, याचा आनंद आहे. नीरज पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज होत आहे. येत्या 7 जुलै रोजी पॅरिस डायमंड लीगमध्ये तो सहभागी होणार आहे. मुख्य प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनिट्झ व फिजीयो इशान मारवाहा यांच्या मार्गदर्शनाखाली तो युरोपमधील तीन ठिकाणी ऑलिंपिकचा सराव करणार आहे. फिनलंड, जर्मनी व तुर्की या ठिकाणी तो कसून सराव करणार आहे.

Exit mobile version