| मुंबई | प्रतिनिधी |
गत विजेते भारत पेट्रोलियम व बँक ऑफ बडोदा यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या विशेष व्यावसायिक गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली. कुमार गटात विजय क्लब व श्रीराम क्रीडा विश्वस्त हे दोन संघ अंतिम विजेते पदासाठी एकमेकांशी लढतील. दादर(पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर झालेल्या विशेष गटाच्या उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियमने मुंबई पोलीस संघाचा 42-15 असा सहज पराभव करीत आरामात अंतिम फेरी गाठली.
आक्रमक खेळाने सुरुवात करणाऱ्या पेट्रोलियमने पहिल्या सत्रातच तीनद संपूर्ण संघ बाद करून देत भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात अत्यंत सावध खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अक्षय सोनी, आकाश रुडले यांच्या झंझावाती चढाया त्यांना अक्षय बेर्डेची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. पोलिस संघाचा रोहित ढगे चमकला. अंतिम फेरीत पेट्रोलियम संघाची गाठ महिंद्राला 25-13 असे पराभूत करणाऱ्या बँक ऑफ बडोदा संघाशी पडेल. पूर्वार्धात चुरशीने खेळला गेलेला हा सामना उत्तरार्धात मात्र एकतर्फी झाला. उत्तरार्धात लोण देत बँकेने आघाडी घेतली. उतत्तरोतर ती वाढवत नेली. एन. पाटील, साहिल राणे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महिंद्राच्या प्रशान पवारने पूर्वार्धात चांगली चमक दाखविली, पण उत्तरार्धात तो कमी पडला.
कुमार गटाच्या उपांत्य फेरीत विजय क्लबने शिवमुद्रा प्रतिष्ठानचा 42-26 असा सहज पराभव केला. मध्यांतरापर्यंत 21-14 अशी आघाडी घेणाऱ्या विजय क्लबने नंतर देखील जोशपूर्ण खेळ करीत आपला विजय साजरा केला. साहिल टिकेकर, रोहन राज, सुजल देशमुख यांच्या चतुरस्त्र खेळामुळे हे शक्य झाले. शिवमुद्राच्या विशाल लाड, समीर पवार यांनी कडवी लढत दिली. दुसरा सामना मात्र अत्यंत चुरशीने खेळला गेला त्यात श्रीराम क्रीडा विश्वस्तने विश्रांतीच्या 17-23 अशा पिछाडीवरून गोलफादेवीला पूर्ण डावात 37-37 अशी बरोबरी साधली. त्यानंतर 5-5 चढायांच्या डावात 46-40(9-3) असा विजय मिळवित धडाक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत श्रीराम संघ विजय क्लब अशी लढत होईल. तुषार शिंदे, भावेश महाजन श्रीराम कडून, तर ओमप्रकाश, विनम्र लाड गोलफादेवी कडून उत्कृष्ट खेळले.