फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता निकडीची
| बेलापूर | प्रतिनिधी |
सणासुदीच्या काळात प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडियातून सोन्याच्या दागिन्यांच्या जाहिरातींचा पाऊस पडत असतो. किमान 50 टक्के ग्राहक केवळ जाहिरातींच्या प्रभावाखाली सोन्याच्या खरेदीकडे वळतात. परंतु, प्रत्यक्षात सूट फक्त नावालाच असते. फसव्या सूट योजनांच्या माध्यमातून नागरिकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल केली जाते. त्यामुळे भाजीपाला खरेदीत काटेकोर असणारे अनेक ग्राहक याला बळी पडत आहेत. नियंत्रण यंत्रणाच्या निष्क्रियतेमुळे ‘सोनेरी’ धूळफेक होत आहे. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता गरजेची असल्याचे बेलापूर येथील सजगर नागरी मंचाकडून बोलले जात आहे.
भारतीयांच्या विशेषतः महिलांच्या मनावर ‘सोने म्हणजे सुरक्षित गुंतवणूक’ हे सूत्र खोलवर बिंबवले गेले आहे. त्यामुळे महिलांचा कल सोन्याकडे अधिक असतो. परंतु, ग्राहकांच्या भावनिक खरेदीचा गैरफायदा सोने व्यापारी घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक नामांकित ज्वेलर्स 50 टक्के सूट, 100 वर्षांचा विश्वास, गुणवत्तेचा वारसा अशा घोषवाक्यांनी ग्राहकांना आकृष्ट करत असतात. परंतु, प्रत्यक्षात सूट फक्त नावालाच असते. फसव्या सूट योजनांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल केली जाते. दागिने घडणावळीच्या सुटी मागे छुपी हकीकत लपलेली असते. 25 ग्रॅमपर्यंत 15 टक्के सूट, 50 ग्रॅमपर्यंत 20टक्के सूट, 75 ग्रॅमपर्यंत 25 टक्के सूट, तर 75 ग्रॅमपेक्षा जास्त 30 टक्के सूट असे स्तर असतात. परंतु, जाहिरात करताना मात्र 50 टक्के सूट हे ग्राहकांच्या मनावर बिंबवले जाते. या अटी जाहिरातींमध्ये स्पष्ट दिलेल्या नसतात. त्यामुळे महिलांसाठी भावनिक खरेदी असल्याने, एकदा दुकानात गेल्यावर पुरुष नकार देत नाहीत आणि दुकानदार याचा फायदा घेतात. त्यामुळे नियंत्रण यंत्रणांची निष्क्रियता ग्राहक लुटीसाठी पोषक ठरते आहे. आयुर्वेद औषधांच्या फसव्या जाहिरातींसाठी पतंजलीवर कारवाई झाली, मात्र सोन्याच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर संबंधित यंत्रणा गप्प बसलेली आहे. ग्राहक हितासाठी लढा देणाऱ्या संघटना-यंत्रणांनी सोनेरी फसवणुकीकडे लक्ष देणे निकडीचे आहे.
डिजिटल व्यवहार बंधनकारक करावे
एकीकडे प्रामाणिक पद्धतीने पैसे जमावणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल करत फसवणूक केली जात असताना सोने खरेदी म्हणजे काळे धन लपवण्याचा ‘सोनेरी' मार्ग ठरत आहे. अशा प्रकारची खरेदी केवळ डिजिटल देयकांच्या माध्यमातून करणे अनिवार्य करण्याचा धाडसी निर्णय काळे धन मुक्तीच्या घोषणा करणाऱ्या सरकारने करायला हवी. सरकारने सोने व्यापारांनी ग्राहकांना ईमेलद्वारे ई-बिल देणे व सर्व व्यवहार फक्त डिजिटल पद्धतीनेच करणे बंधनकारक करावे. सर्व सोने व्यापारांना मंगळसूत्र महोत्सव किंवा तत्सम सवलतींच्या जाहिरातीतच सर्व अटी-शर्ती स्पष्ट नमूद करणे सक्तीचे करावे. सोने दराची अधिकृत माहिती देणारे संकेतस्थळ असावे. सर्व दागिन्यांच्या घडणावळीचे किमान-कमाल दर निश्चित केले जावेत. सोन्या चांदीच्या दुकानातील वजन काट्यांची सातत्याने तपासणी केली जावी.
जागरूकता ही ग्राहकांची देखील जबाबदारी आहे. याचे भान ठेवत ग्राहकांनी भावनिकतेपेक्षा माहिती आणि जागरूकतेच्या आधारावर खरेदीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. असे केल्यास सोनेरी धूळफेक करणाऱ्यांचे डाव आपोआप फसतील.
सुधीर दाणी,
अध्यक्ष, सजग नागरी मंच, बेलापूर







