पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली चिंता
। पनवेल । वार्ताहर ।
खारघरमध्ये काही महिन्यांपूर्वी सुवर्णकोल्ह्याचे अवशेष आढळले होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने नेमका या कोल्ह्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही. यातच खारघरमधील सेक्टर-15 मध्ये रविवारी (दि.10) रात्रीच्या सुमारास खारघरवासियांना सुवर्णकोल्हा मृतावस्थेत आढळला आहे. यामुळे पुन्हा एकदा वन्यजिवांच्या संरक्षणाचा मुद्यावर पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून प्राण्यांसाठी काम करणार्या महाराष्ट्र शासनाच्या प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीच्या मानद प्राणी कल्याण अधिकारी सिमा टँक यांचा एक सहकारी रविवारी खारघरमध्ये रात्री गस्त घालताना होता. त्यांना सेक्टर-15 मधील डी.ए.व्ही. शाळेजवळ रात्री श्वानासारखा दिसणारा प्राणी मृतावस्थेत दिसला. तेथे सिमा टँक व त्यांचे सहकार्यांनी तो सुवर्णकोल्हा असल्याची खात्री केली. मृतावस्थेत कोल्ह्याची माहिती पनवेलच्या वन विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यानंतर मृतावस्थेमधील कोल्ह्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या घटनेनंतर पनवेल, तळोजा ते वाशीपर्यंत पसरलेल्या खाडीपात्रालगतच्या प्राण्यांच्या सुरक्षेबाबत शासन गंभीर नसल्याने प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती प्राणी कल्याण अधिकारी सिमा टँक यांनी समाजमाध्यमांवर दिली. याबाबत वन विभागाच्या अधिकार्यांना संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.