| श्रीवर्धन | वार्ताहर |
समाधानकारक पाऊस व भातशेतीला उपयुक्त वातावरणामुळे तालुक्यात भातशेती तरारली असून उत्पन्न वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे रोगाच्या प्रादुर्भावाचा धोकाही आता कमी दिसून येत आहे.
तालुक्यात बहुतांश शेतकरी कोलम व सुवर्णा या प्रकाराची भाताची लागवड करतात. सुमारे 1300 हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते तर 80 हेक्टर क्षेत्रात नाचणीचे पीक घेतले जाते. तालुक्यातील भातशेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून काही भाग वगळता सिंचनाची व्यवस्था नाही. सध्या हरिहरेश्वर, वाळवटी, दांडगुरी, बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर तसेच वेळास गावांत हळवे, गरवे व निमगरवे भात पीक घेतले जाते. सद्यस्थितीत हळवे भातपीकाला कणीस यायला सुरुवात झाली आहे.
1372 हेक्टरवर भातलागवड; यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने भातशेती चांगली झाली आहे. रोगाचे प्रमाणही कमी आहे. भाताला हेक्टरी 2,183 रुपयांचा हमीभाव निश्चित झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल.
दौलत कुंभार, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन